'त्यांनी ED चौकशी लावली तर मी CD लावेन', असं म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंचं मौन!

'त्यांनी ED चौकशी लावली तर मी CD लावेन', असं म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंचं मौन!

एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे आपली ED कडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज देखील खडसेंना होता.

  • Share this:

भुसावळ, 26 डिसेंबर: भाजपला (BJP) रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दाखल झालेले एकनाथ खडसे (Eknath khadse) यांना अंमलबजावणी संचनालयानं (ED) नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ED च्या नोटीस संदर्भात एकनाथ खडसे यांनी मौन स्वीकारलं आहे. शनिवारी सकाळपासून पत्रकारांनी एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. मात्र, काहीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबरला चौकशीसाठी ED कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आल्याची माहिती शुक्रवारी रात्री उशीरा समजली. दरम्यान, एकनाथ खडसे हे शनिवारी दुपारी 4 वाजता जळगाव येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजते. आता एकनाथ खडसे पत्रकारांशी काय संवाद साधतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा...राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना अर्वाच्च भाषेत धमकी

पुण्यातील भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ED नं एकनाथ खडसे यांना नोटीस बजावल्याचे बोललं जात आहे. एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी बुधवारी (30 डिसेंबर) हजर राहण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना मात्र एकनाथ खडसे यांनी याबाबत बोलण्याचं टाळलं आहे. ख्रिसमस आणि वीकेंडमुळे कदाचित अद्याप खडसेंना ईडीकडून नोटीस मिळालेली नसावी, असंही समजतं.  एकनाथ खडसे यांना ED कडून नोटीस पाठवण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसेंनी दिला होता 'हा' इशारा...

एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे आपली ED कडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज देखील खडसेंना होता. 'त्यांनी ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी भाजपला उद्देशून दिला होता. त्यामुळे आता खरंच एकनाथ खडसे सीडी लावतात का? आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा... ...पण तुम्हाला बोलावलं कुणी होतं? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना देखीव ED कडून नोटीस आली होती. त्यानंतर आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: December 26, 2020, 1:24 PM IST

ताज्या बातम्या