मुंबई, 15 ऑगस्ट : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शासकीय कार्यालयात आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ने संभाषणाला सुरुवात होणार आहे, याबाबतची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आता राज्यात वादंग सुरू झाले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुनगंटीवारांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुधीर मुनगंटीवारांच्या या निर्णयावर टीका केली. यानंतर आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुनगंटीवारांवर निशाणा साधला आहे. काय म्हणाले छगन भुजबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला तर ते जय महाराष्ट्र बोलतात. फोन उचलल्यावर मी वंदे मातरम् म्हणणार नाही तर मी जय महाराष्ट्र म्हणेन, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत. मंत्री झाल्यावर आदेश काढला, या निर्णयात वाईट वाटण्यासारखे काही नाही. काही जण ‘जय हिंद’ बोलतात, तर काही ‘जय महाराष्ट्र’ बोलतात, आमचे पोलीस बांधव फोन केल्यावर जय हिंद म्हणतात, शिवसेनेचे लोक जय महाराष्ट्र म्हणतात, असेही छगन भुजबळ म्हणाले. आपण ज्या ऑर्डर काढतो त्याचे भान ठेवायला हवे, असा टोलाही त्यांनी मुनगंटीवारांना लगावला. तसेच आता शिंदेंनी मुनगंटीवारांना विचारावे, की फोन केल्यावर काय म्हणायचे? अशी खोचक टीकाही भुजबळ यांनी केली आहे. कायद्याने असे कुणावर बंधन घालणे योग्य नाही. लोकांच्या आवडी निवडीनुसार ते बोलतात, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. हेही वाचा - श्वास कुठून घ्यायचा हेपण तुम्हीच ठरवणार? वंदे मातरमच्या निर्णयावरुन वादंग राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सांस्कृतिक कार्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे. याशिवाय मुनगंटीवार यांना वन खात्याची देखील जबाबदारी मिळाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री होताच मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली. “सांस्कृतिक विभागाचा मी पहिला संकल्प महाराष्ट्रात इथून जाहीर करतोय. हॅलो नाही तर वंदे मातरम् बोला. आता चांद्यापासून ते बांद्यापर्यंत मोबाईलवरुन हॅलो ऐवजी वंदे मातरम् बोलून संभाषणाला सुरुवात करा”, असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.