'कुक्कुटपालन आणि साखर कारखाना', राणे-पवारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

'कुक्कुटपालन आणि साखर कारखाना', राणे-पवारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

निलेश राणे यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं.

  • Share this:

मुंबई, 17 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साखर कारखान्यांबाबत लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील दोन युवा नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर निलेश राणे यांनीही रोहित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

'साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर ऑडिट झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षानुवर्ष साथ देत आले आहे. तरी वाचवा?', असा सवाल करत निलेश राणे यांनी थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला होता.

निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनीही खास शैलीत टोला लगावला. मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवारसाहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरावस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी,' अशा शेलक्या शब्दांत रोहित पवारांनी उत्तर दिलं.

रोहित पवारांनी फटकारताच निलेश राणे यांनी आपल्या आधीच्या ट्वीटबाबत खुलासा केला. तसंच रोहित पवारांवर थेट हल्ला चढवला. 'मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही... कुक्कुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? मतदार संघावर लक्ष दे. सगळीकडे नाक टाकू नकोस. नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी,' असा घणाघात निलेश राणे यांनी केला.

दरम्यान, सोशल मीडियाच्या जाहीर व्यासपीठावर हे दोन युवा नेते एकमेकांना भिडल्यावर त्यांचे समर्थकही मैदानात उतरले. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी आपल्या नेत्याचा बचाव करत एकमेकांवर टीकास्त्र सोडलं.

First published: May 17, 2020, 9:08 AM IST

ताज्या बातम्या