Home /News /maharashtra /

शेतकऱ्याने ते दु:ख सांगताच शरद पवार म्हणाले 'हा तर आता माझ्यासमोरही प्रश्न आहे...'

शेतकऱ्याने ते दु:ख सांगताच शरद पवार म्हणाले 'हा तर आता माझ्यासमोरही प्रश्न आहे...'

जळगावातील एका शेतकऱ्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपले दु:ख मांडलं.

    मुंबई, 30 मार्च : 'लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कोणताही व्यापारी आमची केळी घेऊन जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. तुम्ही काहीतरी प्रयत्न करा,' असं म्हणत जळगावातील एका शेतकऱ्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपले दु:ख मांडलं. त्यावर उत्तर देत शरद पवार यांनी त्यांच्या शेतीबाबतही माहिती दिली. 'केळी उत्पादक शेतकऱ्यांबाबतचा प्रश्न नुकताच माझ्यासमोर इतर लोकांनीही मांडला होता. आता केळीचा सीझन सुरू आहे. माझ्या स्वत:च्या शेतीतही केळीची बाग आहे. ही केळी आणखी एका आठवड्यात तयार होतील. माझ्यासमोरही या केळीच्या मार्केटिंगचा प्रश्न आहे. मात्र आताची वेळ नुकसान सहन करण्याची आहे. तरीही आपण सरकारकडे मदत घेण्यासंदर्भातील आग्रह धरू. मी शेती खात्याचा मंत्री असताना केळीवर आलेल्या रोगामुळे खानदेशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र तेव्हा आम्ही त्यांना सरकारकडून मदत केली होती. त्याची आठवण लोक आजही काढतात. आता पुन्हा शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील,' असं म्हणत शरद पवार यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना आश्वस्त केलं आहे. दरम्यान, राज्यातील आणि देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा 'फेसबुक लाईव्ह'द्वारे लोकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी लोकांना घरातच राहण्याचं आणि कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच यावेळी शरद पवार यांनी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर दिली. 'लॉकडाऊनचा काळ अजून वाढेल अशा अफवा पसरवण्यात येत आहेत...त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?' असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन संपायला अजून 2 आठवडे आहेत. या काळात लोकांनी जर नीट काळजी घेतली तर कदाचित हा काळ अजून वाढवण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी.' लॉकडाऊनच्या घोषणेनंतर राज्यातील उसतोड मजुरांची स्थिती बिकट झाली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपण साखर कारखानदारांना याबाबत सूचना दिली असल्याचं सांगितलं आहे. 'तुमच्या कारखान्याची तोड पूर्ण झाली असो वा नसो, तुमच्याकडील ऊसतोड मजुरांची सोय तुम्ही करावी, अशा सूचना मी साखर कारखानदारांना दिल्या आहेत,' असं शरद पवार म्हणाले.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Sharad pawar

    पुढील बातम्या