मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वारावर शुद्धीकरण, ग्रामसभेत एकोप्याचं दर्शन; उरुस आयोजक म्हणाले, हे सगळं भीतीदायक

त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वारावर शुद्धीकरण, ग्रामसभेत एकोप्याचं दर्शन; उरुस आयोजक म्हणाले, हे सगळं भीतीदायक

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात

विना परवानगी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी आता चौकशीसाठी संशयितांना ताब्यात घेतलं जाणार आहे.

नाशिक, 18 मे : त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मीयांच्या जमावाने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणावरून सध्या वाद सुरू आहे. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून तणावाचे वातावरण होते. आता या प्रकरणी पोलिस काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. विना परवानगी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर आणि परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बुधवारी मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदू संघटनांकडून शुद्धीकरण करण्यात आले. तर ग्रामसभेत हिंदू-मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून एकोप्याचं दर्शन घडवलं.

त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही, तरीही 13 मे रोजी इतर धर्मींच्या जमावाने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं होतं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सदर मिरवणूक थांबवून चौकशी केली. तसंच देवस्थान ट्रस्टने लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या 'त्या' प्रकाराची फडणवीसांकडून गंभीर दखल; गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय 

याप्रकरणी देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी रवी जाधव यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. यानुसार अकील सय्यद आणि तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भा.द.वी 295, 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी उरूस आयोजित केला होता. विना परवानगी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी आता चौकशीसाठी संशयितांना ताब्यात घेतलं जाणार आहे.

आमच्या आजोबांपासून परंपरा

दरम्यान, उरूस आयोजित करणारे सलमी सय्यद यांनी काल माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आमच्या आजोबांपासून ही परंपरा चालत आलीय. त्यामुळे आम्ही ती जपतोय. पण असं होईल असं वाटलं नव्हतं. आता कुठेतरी हे थांबावं अशी इच्छा आहे. आमच्याकडून काही चुकलं असल्यास राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी माफ करावं अशा भावना सलीम सय्यद यांनी व्यक्त केल्या.

ग्रामसभेत हिंदू-मुस्लिम उपस्थित

त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरात घडलेल्या प्रकारानंतर बुधवारी ग्रामसभेचं आयोजन केलं गेलं होतं. यावेळी हिंदू-मुस्लिम असे दोन्ही समाजातील नागरिक उपस्थित होते. एका बाजूला हिंदू महासंघाकडून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर शुद्धीकरण केलं गेलं. तर उरुस आयोजित करणाऱ्या सलीम सय्यद यांनी म्हटलं की, त्र्यंबकेश्वरमधील अनेक नागरिक, नेते यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे आहे. उरूस काढला जातो, मिरवणूक चौकातून जाते तेव्हा त्र्यंबकराजाला धूप दाखवण्याची परंपरा आहे. पण यावेळी वेगळंच घडलं. हे सगळं भीती वाटण्यासारखं आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी साध्या पद्धतीने उरूस काढू, अन्यथा प्रथा बंद करू, मंदिराला धूप दाखवणार नाही.

एसआयटी स्थापन करावी - फडणवीस

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एक विशिष्ट जमाव जमला होता. त्यांच्याकडून कथितरित्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. या घटनेची आता गृहमंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआटी स्थापन करावी असं फडणवीसांनी म्हटलं आहे. ही एसआयटी गेल्या वर्षीच्या प्रकरणाची देखील चौकशी करणार आहे.

First published:
top videos

    Tags: Nashik, Trimbkeshwar Temple