विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 16 फेब्रुवारी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. त्यामुळे सर्वत्र शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू आहे. विविध मंडळाच्या माध्यमातून शिवसृष्टी साकारण्याचं काम सुरू आहे. नाशिक चे प्रसिद्ध मूर्तिकार आनंद सोनवणे आणि विवेक सोनवणे या दोघा भावांनी आपल्या वास्तुशिल्प आर्ट स्टुडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध मूर्ती साकारल्या आहेत. 100 रुपयांपासून तर तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत या ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी असून त्यांना शिवप्रेमींकडून मोठी मागणी आहे. देशभरातून मूर्तींना मागणी आनंद सोनवणे आणि विवेक सोनवणे हे दोघे भाऊ गेल्या आठ ते दहा वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तुशिल्प आर्ट स्टुडिओमध्ये विविध मूर्ती साकारत असतात. त्यांच्या कुशल कामगिरीमुळे ते चांगलेच प्रचलित झाले आहेत. त्यामुळे राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून त्यांच्या मूर्तींना मागणी होत आहे. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचं काम केलेलं आहे. छोटे मोठे स्मारक उभारण्याचं शिवसृष्टी उभारण्याचं ते काम करत असतात.
मूर्ती साकारल्या जातात दरवर्षी शिवजयंतीला वास्तुशिल्प आर्ट स्टुडिओमध्ये मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात असते. यावर्षी देखील शिवजयंतीचा उत्साह हा मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे या वास्तुशिल्प आर्ट स्टुडिओमध्ये तुम्हाला हवी तशी मूर्ती या ठिकाणी बनवून मिळते. ब्रांझ, पितळ, फायबर, शाडू माती अशा विविध वस्तूंपासून मूर्ती साकारल्या जातात, अशी माहिती वास्तुशिल्प आर्टचे संचालक आनंद सोनवणे यांनी दिली आहे. महाराजांच्या मूर्ती साकारताना वेगळाच आनंद आम्ही गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मूर्ती साकारण्याचं काम करत आहोत. मात्र यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारताना एक वेगळाच उत्साह मनात असतो. त्यांचं चैतन्य, रुबाब, दिमाखदारपणा, शौर्य, पराक्रम साहस, धाडसी वृत्ती, असे विविध बारकावे मूर्ती साकारताना लक्षात ठेवावे लागतात आणि त्यामुळे आपल्या मनात देखील चैतन्याची भावना निर्माण होते. महाराजांच्या पराक्रमाची, त्यांच्या शौर्याची आठवण येते. स्वतःला नशीबवान समजतो की आम्ही मूर्ती साकारण्याचं काम करत आहोत, अशी प्रतिक्रिया विवेक सोनवणे यांनी दिली आहे.
कुठे आहे वास्तुशिल्प आर्ट स्टुडिओ ? नाशिक शहरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर मखमलाबाद गावाच्या लगत वास्तुशिल्प आर्ट स्टुडिओ आहे.