नाशिक, 26 मार्च : उद्धव ठाकरे यांच्यासोबत ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांना त्याच खोक्या खाली चिरडायचे आहे, असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मालेगावात केलं. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमधल्या मालेगाव येथे मोठी सभा होत आहे. यासाठी ठाकरे गटाच्या नेते, कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. पक्षाची मोट पुन्हा बांधण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार आहेत. त्यापैकी पहिली सभा कोकणातील खेड येथे झाली. तर दुसरी सभा आज मालेगावात होणार होत. यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
मालेगावमध्ये एक फिल्म इंडस्ट्री आहे, मालेगाव के शोले, आता ही सभा पाहिली तर शोले भडकले आहे. निवडणूक आयोगाला खरी शिवसेना पाहायची असेल तर इथं यावं. निवडणूक आयोगाच्या बापाला विचारून बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नाही.
ही शिवसेना पुन्हा एकदा सगळ्यांशी लढा देणार आहे आणि मंत्रालयावर भगवा फडकवणार आहे. मालेगावामध्ये सभा का घेत आहोत, शिवसेना ही तुटलेली नाही, झुकलेली नाही, सर्व देशातील लोक शिवसेनेच्या पाठीशी उभे आहे, हे सांगण्यासाठी ही सभा आहे.
हा प्रामाणिक शिवसैनिक तुमच्या सोबत आहे, चिते की चाल और बाज की नजर...उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणावर कोणी संशय घेऊ शकत नाही.
कांद्याला भाव नाही, शेतकरी रस्त्यावर कांदा फेकत आहे, आपल्याला त्या सुहास कांदेला रस्त्यावर फेकायचं आहे. त्या गुलाबराव पाटलाला रस्त्यावर फेकायचं आहे, उद्धव ठाकरेंसोबत ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांना त्याच खोक्या खाली चिरडायचे आहे.
शिवसेनेचं पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने काढून घेतलं, आमचं नाव काढून घेतलं तरी ही शिवसेना ठामपणे उभी आहे. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलेच राज्य येईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होती, शेतकऱ्यांना न्याय देतील, त्यासाठी लढा द्यायचा आहे.
सभेपूर्वी ठाकरेंना धक्का
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज ठाणे येथे ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी 15 ते 20 महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्यामागचं कारण विचारलं असता या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, “नाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना बोलण्याची पद्धत नाही. तिथे सभेत स्टेजवर महिलांच्या लाली-लिपस्टिकचा विषय काढला जातो. तुमचे हात वर असतील तर तंगड्या माझ्याकडे आहेत, अशा भाषेत कोणी बोलत असेल, कोणी आमच्या चारित्र्याला धक्का पोहोचवत असेल तर त्यांच्यासोबत काम करणं आम्हाला शक्य नाही.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut