नाशिक, 31 मार्च : देशभरात काल राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राम नवमीनिमित्त संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. मात्र या पूजेवरून वाद निर्माण झाला आहे. मंदिराच्या महंतांनी पूजा पुराणोक्त पद्धतीनं करण्यास सुरुवात केल्यानंतर संयोगीताराजे छत्रपती यांनी या पूजेला विरोध केला, पूजेचे मंत्र हे वैदिक पद्धतीनं म्हणावेत असं संयोगीताराजे छत्रपती यांनी महंतांना सांगितले. हा सर्व प्रकार त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत समोर आणला. सध्या संयोगीताराजे छत्रपती यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
नेमकं काय म्हटलं पोस्टमध्ये?
'नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला.अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला.शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच'.
View this post on Instagram
'तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली.या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे… अजूनही खूप प्रवास बाकी आहे...अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे'! असं संयोगीताराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik