नाशिक, 04 डिसेंबर : बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून हटवण्याची मागणीच भाजप नेत्यांनी केली आहे. या मागणीमुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
मालेगाव मधील बोरे आंबेदरी येथील पाण्याची चारी बंद करण्याचा निर्णय भुसे यांनी घेतल्याने शेतकरी आणि भाजप नेते संतप्त झाले आहे. शनिवारी याच विषयावरून एका शेतकऱ्याने विष प्राशन केलं होतं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. चारी बंद करून पाईपलाईनद्वारे पाणी नेल्यास या भागातील अनेक शेतकऱ्यांची जमीन ओसाड होऊन पिके उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.
(सुप्रिया सुळेंवर टीका भोवली, 'सत्तारांवर योग्य ती कारवाई करा', राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र)
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे ठेकेदाराला पोहोचण्यासाठी चारी बंद करून पाईपलाईनद्वारे पाणी पिण्याचा घाट घालत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. मालेगाव मधील भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दादा भुसे यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. अद्वय हिरे यांच्या मागणीमुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आली आहे.
'सत्तारांवर योग्य ती कारवाई करा', राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांमा पत्र
दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका करणारे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी सूचना केला आहे.
(भाजप आणि शिंदे गटात चाललंय काय? राऊतांचा खळबळजनक दावा)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या सिल्लोडमध्ये होणाऱ्या जाहीर सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद आणि सिल्लोड दौऱ्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलत असताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देताना अपशब्द वापरले होते. या प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तार यांच्यावर जोरदार आक्षेप घेतला होता. अखेर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंच्या बाबतीत केलेल्या विधानाची राज्यपालांनी दखल घेतली आहे. राज्यपालांनी याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. सत्तार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असं पत्रात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महिलांकडून राज्यपालांकडे सत्तार यांची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल राज्यपालांनी घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news