विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी
नाशिक 10 मार्च : नाशिक शहराला सांस्कृतिक आणि धार्मिकतेचा वारसा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. दक्षिणेतील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीच्या तीरावर नाशिक शहर वसलेल आहे. नाशिक शहरातील होळी सणाची चर्चा देशभरात मोठ्या प्रमाणात केली जाते. होळीनंतर धुळवडीच्या दिवशी नाशिकमध्ये वीर मिरवण्याची परंपरा आहे. सर्वत्र धुळवड साजरी केली जाते. मात्र, नाशिकमध्ये वीरांची मिरवणूक निघते यात नाशिककर मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात. त्यानंतर रंगपंचमीला रंगोत्सवाबरोबरच रहाड रंगोत्सव साजरा केला जातो. याचं रहाड संस्कृतीबद्दल धर्मशास्त्र अभ्यासक डॉ.नरेंद्र धारणे यांनी माहिती दिली आहे.
कशी झाली रहाडींची निर्मिती?
पेशव्यांच्या काळात रहाडीची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. पेशव्यांचे सरदार रास्ते होते. हे सरदार अतिशय विश्वासू आणि हुशार होते. त्यांच्या पत्नीचे माहेर हे नाशिक असल्यामुळे ते नाशिकमध्ये जास्त प्रमाणात राहायचे. इथले हवामान त्यांना चांगलं वाटायचं त्यामुळे ते इकडे जास्त राहत असतं. त्याच काळात त्यांनी सतराव्या शतकात दगड आणि चुन्याचा वापर करून रहाडींची निर्मिती केली. तेव्हा या ठिकाणी कुस्त्यांचे आखाडे असायचे. या रहाडींचे बांधकाम बघता सर्व रहाडींचा आकार सारखाच आढळून येतो. संपूर्ण नाशिक शहरात आधी 18 राहाडी अस्तित्वात होत्या. आता त्या 3 आहेत अगोदर या रहाडी पेशवे सरदारांच्या अखत्यारीत होत्या आता मात्र कालांतराने तालीम संघांच्या अखत्यारित आहेत, असं धर्मशास्त्र अभ्यासक डॉ.नरेंद्र धारणे सांगतात.
रंगाचा उत्सव रहाडीत खेळला जातो
साधारण 25 बाय 25 फुटाचे आणि आठ फूट खोलीचे पेशवेकालीन दगडी हौद म्हणजेच या रहाडी नाशिकमध्ये पाहायला मिळतात. जुने नाशिक व पंचवटीच्या काही भागात या रहाडी आहेत. पेशवे काळात हा भाग गावठाण परिसर होता. आता मात्र याचे शहरी करण झाले असले तरी इथे परंपरा तितकीच जपली गेली आहे. होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फाल्गुन पौर्णिमेला संपूर्ण भारतात धुळवड साजरी केली जाते मात्र नाशिकमध्ये होळी झाल्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच फाल्गुन कृष्ण पंचमी अर्थात रंगपंचमीला रंगोत्सव साजरा केला जातो. भारतातील विविध प्रदेशात हा रंगाचा उत्सव तेथील पारंपारिक पद्धतीने खेळला जातो आणि प्रामुख्याने नाशिकचा रंगाचा उत्सव हा रहाडीत खेळला जातो.
होळीनंतर खोदण्यास सुरुवात
नाशिकमध्ये असलेल्या रहाडी या होळी झाल्यानंतर परंपरागत पूजा विधी करून खोदण्यास सुरुवात केली जाते. रंगपंचमीच्या आदल्या दिवसापर्यंत स्वच्छ पाण्याने धुऊन रंगरंगोटी करून सजवल्या जातात. नाशिक शहरात सध्या 3 रहाडी आहेत आणि त्या रंगपंचमीच्या दिवशी खुल्या केल्या जातात. काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजाला असणाऱ्या शनी चौकातील रहाड ही गुलाबी रंगाची असते तर जुन्या नाशकात असलेली तीवंधा चौकातील रहाड ही केशरी रंगाची असते. गाडगे महाराज पुलाजवळील रहाड पिवळ्या रंगाची असते या रहाडींमध्ये स्वच्छ पाणी भरले जाते आणि त्यात नैसर्गिक रित्या तयार केलेला रंग टाकला जातो.
तांदळाच्या दाण्यांपासून साकारले छत्रपती शिवाजी महाराज ! पाहाताच क्षणी कराल मुजरा! Video
हा रंग विविध प्रकारच्या वनस्पतीच्या फुलांपासूनतयार केला जातो. त्या फुलांना सुमारे दोन-अडीच तास एका मोठ्या भांड्यात टाकून उकळविले जाते हा रंग इतका पक्का असतो की रहाडीत जाऊन आलेला माणसावरील रंग जवळपास दोन तीन दिवस निघत नाही. हा उकळलेला रंग पाण्यात मिसळून जलदेवतेची विधिवत पूजा करून रहाडी भोवती प्रदक्षिणा मारून त्यात रहाडीचे मानकरी उड्या टाकतात. त्यानंतर नागरीक रहाडीत उड्या टाकतात, असंही धारणे सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.