नाशिक, 17 जानेवारी : सध्या हिवाळा सुरू आहे आणि अशातच नाशिकमध्ये त्वचारोगाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यात सोरायसिस आणि नायटा हे त्वचारोगाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जर त्वचारोगासंदर्भात काही लक्षणे आढळून आली तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, असं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे.
काय आहेत लक्षणे?
नायटा त्वचारोग अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहे. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत, कमरेवर दगडफूलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यात त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. या त्वचारोगाची मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे तसेच घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो.
यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. याठिकाणी खरुज, नायटा वाढतो. कडा असलेल्या गोलाकार स्वरुपात त्वचेवर उठणारा नायटा हा एक प्रकारच्या बुरशी, आळब्यासारख्या सुक्ष्म शेवाळामुळे होणारा रोग आहे. चमडीच्या कोणत्याही भागावर गोलाकार चट्टे उठतात. पण विशेषतः काखा, जांघा, बोटांच्या मधील भाग नेहमी ओलसर राहणाऱ्या जागांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे स्वच्छता खूप महत्वाची असते.
सोरायसिस त्वचारोगाची लक्षणे
सोरायसिसची लक्षणे अनेक रुग्णांमध्ये दिसून येतात. ती वेगवेगळी लक्षणे असतात. तो सोरायसिसचा कोणता प्रकार आहे. त्यावर अवलंबून असते. सोरायसिसचे निशाण कोपरावर लहान असतात. अनेकदा हे चट्टे शरीराच्या जास्तीत जास्त भागावर पसरतात. त्वचा लाल होणं, त्यावर चट्टे पडणं, जळजळ होणं, नखं जाड होणं, सांधे दुखणं ही सोरायसिसची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या असं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाचे शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी केले आहे.
सोलापूरमध्ये जानेवारी महिन्यात दिवाळी साजरी, 2 वर्षांनी आला 'तो' योग! Video
नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षेभरात जवळपास 35 हजार रुग्ण हे त्वचेच्या आजारासंबंधित आढळून आले आहेत. त्यात विशेष करून सोरायसिस आणि नायटा याचे रुग्ण जास्त प्रमाणात समोर आलेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या शरीराची चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. जितकं आपले शरीर व्यवस्थित स्वच्छ राहील तितकं आपण त्वचे सबंधित आजारांपासून दूर राहू, असं अशोक थोरात यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.