बब्बू शेख, प्रतिनिधी
नाशिक, 26 मार्च : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मस्जीद, मजार आणि दर्ग्याची उभारणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम व सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई करून उध्वस्त केले होते. यानंतर मनसेने आणखी काही अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी इशारा दिला आहे. यावर आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली आहे. ते येवल्यात बोलत होते.
देशात दुसरे प्रश्न नाहीत : बच्चू कडू
पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर बच्चू कडू यांनी टीका केली आहे. इकडे मस्जिद काढा, तिकडे मंदिर बांधा, येथील भोंगे उतरवा हे काही देशाचे प्रश्न नाहीत. शेतकऱ्यांचे आणि इतरही अनेक प्रश्न असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. मालेगाव येथे होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेवर त्यांनी टीका केली. सभा घेतली तर लोक दुसरा आमदार निवडून देतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थिती केला आहे.
वाचा - मालेगावातील सभेपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का! शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला (बुधवार 22 मार्च) सभा झाली होती. या सभेत त्यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्गा, सांगलीतील मशीद आणि मशिदीवरील भोग्यांसंदर्भात आवाज उठवला. माहीमचा दर्गा अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा, नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाई केली. सांगलीतही अशीच कारवाई झाली. परंतु दुसरीकडे राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात पुणे शहरात आधी तक्रार दाखल केली गेली. त्यानंतर आता कोर्टातही तक्रार अर्ज दाखल केला आहे.
सांगलीतील अनधिकृत बांधकामही हटवले
सांगलीतील कुपवाड येथे शाळेची जागा असताना त्या ठिकाणी अनधिकृत मशिदीचं बांधकाम करण्यात आलं होतं. अखेर राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सांगलीतील हे बांधकाम हटवण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगलीतील जुना कुपवाड रोडवरील मंगलमूर्ती कॉलनी येथील बेकायदेशीररित्या मशीद उभारण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर सांगली महापालिकेकडून या ठिकाणी पाहणी करण्यात आली. महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी या जागेवर बांधण्यात येणारे बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले आणि त्यावर कारवाई करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bachchu Kadu