नाशिक, 26 डिसेंबर : नाशिक ही ऐतिहासिक क्रांतिकारकांची भूमी आहे. स्वातंत्र्य संग्रामात या भूमीत अनेकांनी रक्त सांडल आहे. एका ऐतिहासिक घटनेने आज ही अंगावर शहारे येतात. ती घटना म्हणजे, क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी नाशिक जिल्हाधिकारी पदी असलेल्या जॅक्सनची 1909 साली गोळ्या झाडून हत्या केली होती. ते पिस्तूल सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेले आहे. हा दुर्मिळ ठेवा नाशिककरांसाठी खुला करण्यात आला असून 31 डिसेंबरपर्यंत पहाता येणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मुशीत तयार झालेले थोर क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी 21 डिसेंबर 1909 रोजी ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन यांची नाशिकच्या विजयानंद थिएटर मध्ये गोळ्या घालून हत्या केली होती. तेव्हापासून हा दिवस हुतात्मा अनंत कान्हेरे शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनच्या वधासाठी वापरलेली पिस्तूल पाहण्याची संधी नाशिककरांना खुली करून दिली आहे. हा पिस्तूल पाहण्यासाठी नागरिक सार्वजनिक वाचनालयात गर्दी करत आहेत. 31 डिसेंबरपर्यंत दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत सार्वजनिक वाचनालय नाशिक इथं पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे अशी माहिती इतिहास अभ्यासक राजेश चंद्रात्रे यांनी दिली आहे.
Nashik : पुस्तक खरेदीवर मिळेल 50 टक्के सूट, पाहा कुठं आहे ही ऑफर? Video
तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन आणि त्यांचे इतर साथीदारांकडून भारतीयांचा अमानुषपणे छळ केला जात होता. हा छळ बंद व्हावा यासाठी थोर क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली होती. विशेष म्हणजे तेव्हा अनंत कान्हेरे 18 वर्षाचे होते. अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनची हत्या केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यातच त्यांना फाशी देण्यात आली.
कुठे पहाता येणार पिस्तूल? सार्वजनिक वाचनाल टिळक रोड, शालीमार, नाशिक, महाराष्ट्र