नाशिक 29 ऑगस्ट : कोणताही खेळ हा खेळाडूचे कौशल्य, जिद्द आणि गुणवत्ता याचा कस पाहणारा असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा असेल तर या सर्वच गोष्टीचं सर्वोत्तम प्रदर्शन करावं लागतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अवघड स्पर्धामध्ये आयर्नमॅन (Ironman) या स्पर्धेचा समावेश होतो. नाशिकच्या पोलीस नाईक अश्विनी देवरे यांनी नुकतीच कझाकिस्तानमध्ये झालेली ही स्पर्धा पूर्ण केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नवूमन (Ironwomen) होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (National Sports Day) त्यांच्या या यशाचा प्रवास आपण जाणून घेऊया कसा झाला प्रवास? नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील जायखेडा हे अश्विनी यांचे मुळ गाव. शेतकरी कुटुंबातील अश्विनी यांनी शिकून मोठं व्हावं अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. अश्विनीचे पहिले ते बारावी पर्यंतचे शिक्षण जायखेडा या मुळगावीच झालं. शाळेत हुशार असलेल्या अश्विनींना खेळात जास्त रस होता. शिकून खूप मोठं व्हायचं त्यांचं ध्येय होतं. बारावीत असताना त्यांनी अनेक बक्षीस मिळवली होती. त्यानंतर क्रीडा कोट्यातून त्यांना पोलीस दलात नोकरी मिळाली. काही दिवसांत त्या मुंबई पोलीसमध्ये भरती झाल्या. त्यांनी खेळ आणि नोकरी सांभाळत ताराबादमध्ये पदवीपर्यंतचे तर सटाणामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पती सैन्यात, दोन लहान मुलांचा सांभाळ अश्विनी यांनी आयर्नमॅन स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. त्यांचे पती गोकुळ देवरे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. अनिकेत आणि शौर्य अशी त्यांना दोन मुलं आहेत. नोकरी आणि मुलांची जबाबदारी अशी दुहेरी कसरत सांभाळत सरावासाठी वेळ काढणं सोपं नव्हतं. पण, त्यांनी जिद्द सोडली नाही. सकाळी ड्यूटी असायची तेव्हा तर त्यां पहाटे 3 वाजता उठून आपल्या दोन लहान मुलांना घरात सोडून, सायकलिंग,स्विमिंग आणि रनिंगचा सराव करत असत. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी हे यश मिळवले आहे. टीम इंडियाचा पाकिस्तानवर थरारक विजय, टीव्हीवर मॅच पाहूनही लक्षात नसतील आल्या या 5 गोष्टी आयर्नमॅन स्पर्धा कशी असते? आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक फिटनेसचा कस या स्पर्धेत लागतो. 14 ऑगस्ट रोजी कझाकीस्तान येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अश्विनी देवरे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत स्विमिंग, रनिंग आणि सायकलिंग असे प्रकार असतात. सहभागी खेळाडूंना 4 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग पूर्ण करावे लागते. हे सर्व टप्पे पूर्ण करण्यासाठी त्यांना 17 तासांची मुदत असते. अत्यंत आव्हानात्मक अशी ही स्पर्धा अश्विनी यांनी 14 तास 24 मिनिटं आणि 46 सेकंदामध्ये पूर्ण केली. ….आणि मुलाचा आवाज कानात घुमू लागला अश्विनी यांनी आत्तापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 40 सुवर्ण, 21 रौप्य तर 28 कांस्य पदकांची घसघशीत कमाई केली आहे. पण, आयर्नमॅन स्पर्धेच्या आदल्या दिवशीच त्यांना प्रचंड ताप भरला होता. त्यामुळे थकवाही जाणवत होता. त्या परिस्थितीतही आजवर केलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून अश्विनी स्पर्धेत उतरल्या. ‘स्पर्धा सुरू झाली स्विमिंग करत असताना,काही अंतरावर गेल्यानंतर प्रचंड त्रास सुरू झाला,खोकला येऊ लागला.शरीराने साथ सोडल्या सारखं जाणवू लागलं. मात्र,तोच माझ्या मुलांचा आवाज कानात घुमू लागला मम्मी कमॉन,आप कर सकते हो आणि मला नवी ऊर्जा मिळाली. माझ्या 8 वर्षाच्या मुलाने अनिकेतने माझ्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. तोच माझ्या पाठीशी असायचा,स्विमिंग त्याने शिकवलं, मी सायकलिंग करताना तो सोबत असायचा. त्याच्या बॅगेत मला केळी घेऊन यायचा, माझ्या या यशात मुलाच्या मेहनतीचाही मोठा वाटा आहे,’ असं अश्विनी यांनी सांगितलं. सरदार मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सवाला सुरूवात, पाहा काय आहे 308 वर्षांची परंपरा VIDEO नाशिक शहर माजी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी देखील आयर्नमॅन होण्याचा बहुमान मिळवला होता. त्यांचीच प्रेरणा घेऊन अश्विनी या स्पर्धेसाठी सज्ज झाल्या होत्या. स्पर्धेसाठी पोलीस दलातील अनेक वरिष्ठांचे त्यांना पाठबळ मिळाले. मात्र क्रीडा प्रशिक्षक अशपाक शेख यांनी अतिशय मेहनत घेऊन बारकाईने त्यांचा सराव करून घेतला. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं. ‘आश्विनीला क्रीडा क्षेत्राची खूप आवड आहे. तिने आतापर्यंत अनेक बक्षीसं मिळवली आहेत. अनेक मॅरेथॉनमध्ये तिने सुवर्णपदक पटकावलं आहे. तिने आयर्नमॅन स्पर्धेची कल्पना माझ्या जवळ मांडली तेव्हा मी तात्काळ तिला होकार दिला. कारण तिच्यात करण्याची जिद्द आहे.त्यामुळे ती हे सर्व करू शकली,’ असं शेख यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







