नाशिक 29 डिसेंबर : मंदिरांची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकची आता, मिसळची नगरी म्हणून देखील ओळख निर्माण झाली आहे. नाशिकच्या गलोगल्लीत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळची चव चाखायला मिळते. नाशिक शहराच्या जवळपासच्या भागातील मिसळही आता चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामध्ये पांढुंर्ली रोडला असलेली चुलीवरची वरद मिसळ ही लोकप्रिय आहे. अतिशय चमचमीत आणि झणझणीत असलेली ही मिसळ खाण्यासाठी खवय्यांची नेहमीच गर्दी होत असते.
नोकरी सोडून व्यवसाय
गोकुळ घुगे आणि वैशाली घुगे या दाम्पत्याने 2017 साली आपल्या शेतात ही चुलीवरची मिसळ सुरू केली आहे. विशेष म्हणजे उच्चशिक्षित असलेल्या वैशाली घुगे यांनी शिक्षक नोकरी सोडून पतीला व्यवसायात मदत करण्याचं ठरवलं. ग्राहक हेच आपले देव असतात त्यांच्यावरच आपलं सर्व चालतं, त्यामुळे मिसळ बनवताना कोणतीही काटकसर त्या करत नाही, उच्चप्रतिच्या वस्तू त्या वापरतात. मसाले देखील बाहेरून आणत नाही. घरीच मसाले बनवतात आणि चुलीवर मिसळ बनवतात. त्यामुळे मिसळची चव अतिशय छान लागते, एकदा खाणारा ग्राहक इथं नेहमी येतो, असे घुगे यांनी सांगितले.
कुठे आहे वरद मिसळ?
नाशिकच्या पाथर्डी फाट्यापासून साधारण 17 किलोमीटर अंतरावर भगुर पांढुंर्ली रोडला निसर्गरम्य वातावरणात अस्सल चुलीवरची वरद मिसळ आहे. मिसळची चांगली जंबो प्लेट 90 रुपयांमध्ये आहे. एका प्लेटमध्ये मिसळ, दोन पाव,पापड, सलाड, दही,हिरव्या मिरचीचा ठेचा,लोंच,स्वीट सोनपापडी,फरसान,मटकी,कांदा, आणि लिंबू दिले जाते. एक प्लेट मिसळ खाल्ली की तुमचं पोट अगदी गच्च भरते.
मिसळची खास वैशिष्टय
मिसळ पूर्णतः चुलीवर बनवली जाते,मिसळमध्ये घरगुती मसाले वापरले जातात.बाहेरचे मसाले टाकले जात नाही,तेल आणि इतर वस्तू देखील उच्च प्रतीच्या वापरल्या जातात.सर्व वस्तू फ्रेश असतात. मिसळ खाल्ल्यामुळे कोणताही त्रास होत नाही,आणि निसर्गरम्य वातावरणात बसून तुम्हाला मिसळचा आस्वाद घेता येतो.
प्रेम ओता चविष्टच लागेल...
'आपण जे काही करतो ते मन लावून करा, त्यात झोकून द्या, नक्कीच त्यात यश मिळेल. ग्राहकांना चांगल्या प्रतीची वस्तू द्या, ग्राहक दुसऱ्यांदा नक्की तुमच्याकडे येईल,आणि आपल्या व्यवसायात काम करताना लाज अजिबात बाळगू नका,मी शिक्षक होते, माझं शिक्षण बीए. डीएड झालं आहे.चांगला पगार चांगली नोकरी होती.
Nashik : फक्त 40 रूपयांमध्ये खा पोटभर बिर्याणी; चवही असते एकदम झकास, VIDEO
आपणही चांगली नोकरी व्यवसाय करू शकतो, हा विश्वास होता. त्यामुळेच शिक्षिकेची नोकरी सोडून नवऱ्याच्या मदतीनं व्यवसाय सुरू केलं. आज त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय, हे पाहून आनंद वाटतोय. कोणतंही काम मन लावून करा त्यामध्ये यशस्वी व्हाल,' अशी प्रतिक्रिया वैशाली घुगे यांनी दिली आहे.
गुगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Local18, Local18 food, Nashik