नाशिक, 6 मार्च : नागपुरात एका अल्पवयीन मुलीने यू-ट्यूब पाहून घरीच स्वत:ची प्रसूती केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली होती. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली. ही घटना ताजी असताना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात काल (रविवार 5 मार्च) एक धक्कादायक घटना समोर आली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने आईनेच मुलीची प्रसूती केल्याची बाब उघडकीस आली.
काय आहे प्रकरण?
बरड्याचीवाडी या गावातील यशोदा त्रंबक आवटे ही महिला प्रसूतीसाठी रविवारी सकाळी आई आणि आशा वर्करसोबत अंजनेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या होत्या. मात्र, आरोग्य केंद्रात डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते आणि ही परिस्थिती बघता, तसेच मुलीला वेदना असह्य होत असल्याने अखेर आईनेच आशा वर्करच्या मदतीने मुलीची प्रसूती केली. या सर्व घटनेबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी देखील केली. या आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी नीट पीजीच्या परीक्षेला गेले असल्याने, ते आरोग्य केंद्रात नव्हते. त्यांनी मुख्यालय सोडताना कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत आढळले. दुसरे वैद्यकीय अधिकारी देखील आजारी असल्याचे कारण सांगून, कुठलीही व्यवस्था न करता गैरहजर होते. त्यामुळे या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली.
वाचा - Instagram वर मैत्री; मग मुलीवर लैंगिक अत्याचार, ब्लेडने शरीरावर लिहिलं नाव,अन्..
नागपुरात काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलीची इंस्टांग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटींग होत होते. एक दिवस तरुणाने पीडित मुलीला भेटायला बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या घरच्यांपासून लपवून ठेवला होता. ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. 3 मार्च रोजी मध्यरात्री तिने यू-ट्यूब पाहून घरीच स्वत:ची प्रसूती केली. प्रसूती झाली तेव्हा ती घरी एकटी होती. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बाळ जन्मल्यानंतर त्याचा मृतदेह संशयास्पद ठिकाणी आढळून आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर बाळाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.