नाशिक, 16 जानेवारी : नाशिक विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये काँग्रेसचा हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे खळबळ उडाली आहे. आता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी हायकमांडकडे केली आहे.
नाशिक विधान परिषदेचे उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या खेळीमुळे काँग्रेसचं हसू झालं आहे. वडील सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देऊन सुद्धा त्यांनी अर्ज भरला नाही. तर त्यांचा मुलगा सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाईची सूचना करण्यात आली आहे. काँग्रेसत्या शिस्त पालन समितीकडून सुचना करण्यात आली आहे. त्यामुळे तांबेंच्या निलंबनाची कारवाई अटळ आहे.
तर दुसरीकडे, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ.सुधीर तांबे यांच्या नावाने डमी उमेदवार असलेले डॉ.सुधीर सुरेश तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. डॉ.सुधीर सुरेश तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. एकच सारखे नाव असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण डॉ सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म असून देखील अर्ज सादर केला नव्हता. डमी उमेदवार असलेले सुधीर तांबे हे मूळचे पनवेल येथील आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अमोल खाडे यांची देखील माघार घेतली आहे. 22 उमेदवारांपैकी आतापर्यंत 2 जणानी माघार घेतली आहे.
शुभांगी पाटील गायब
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. अशातच अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांच्याशी कुणाचाही संपर्क होत नाही.
शुभांगी पाटील यांची गाडी अंबड परिसरात सापडली आहे. गाडी लावून शुभांगी पाटील सकाळपासून गायब आहे. त्यांनी आपली गाडी घरी लावण्याऐवजी समोरच असलेल्या मैदानात लावली आहे. त्यांच्या संपर्क होत नाहीये. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी शुभांगी पाटील यांनी मुंबईत येऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवसेनेनं पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik