विठ्ठल भाडमुखे प्रतिनिधी
नाशिक 3 मार्च : आपण कोणताही व्यवसाय करताना तो विचारपूर्वक जर केला तर नक्कीच आपण त्या व्यवसायात यशस्वी होतो. हे नाशिकच्या राहुल गवळी यांनी दाखवून दिल आहे. राहुल गेल्या अनेक वर्षांपासून दुधाचा व्यवसाय करत आहेत. मात्र, दुधातून त्यांना फारसं काही उत्पन्न मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवायला सुरुवात केली. बघता बघता त्यांच्या या पदार्थांना ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यातून त्यांना आता चांगलं उत्पन्न देखील मिळत आहे.
कोणते पदार्थ बनवतात?
राहुल गवळी हे मूळचे नाशिक मधीलच आहेत. अशोक स्तंभावर कृष्णा डेअरी नावाने त्यांच दुकान आहे. दुधातून त्यांना फारसं काही उत्पन्न मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी दुधाचे लस्सी, ताक, दही, तूप, लोणी, मिठाईचे पदार्थ बनवायला सुरुवात केली. त्यातील त्यांची लस्सी आणि ताक खवय्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. दररोज अनेक जण त्यांची लस्सी आणि ताक पिण्यासाठी येत असतात. 25 रुपयांना लस्सीचा एक ग्लास मिळतो.
दुधाच्या पदार्थांना चांगली मागणी
शेतकरी हे दूध विक्रीचा व्यवसाय करत असतात मात्र ते दूध एखाद्या डेअरीला देत असतात. त्यातून त्यांना अल्पसा भाव मिळतो. त्यामुळे त्यांना चांगलं उत्पन्न मिळत नाही. मात्र, आपण जर आपल्या दुधापासून विविध पदार्थ तयार करून ते जर बाजारात विकले तर त्या पदार्थांना दुधाच्या किंमती पेक्षा जास्त भाव मिळत असतो. मी सुरु केलेल्या दुधाच्या पदार्थांना ग्राहकांची चांगली मागणी आहे. यातून मला महिन्याकाठी लाखोंचा नफा मिळत असल्याची प्रतिक्रिया राहुल गवळी यांनी दिली आहे.
नाशिकच्या तरुणानं केली आधुनिक ड्रोनची निर्मिती, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, Video
शेतकऱ्यांनी व्यवसायाकडे वळण्याची गरज
सध्या शेतकऱ्यांच्या मालाची परिस्थिती फार बिकट आहे. कोणत्याही मालाला चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी जर शेतीला जोडधंदा किंवा पूरक व्यवसाय सुरू केला तर त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं, असंही राहुल गवळी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Local18, Nashik