नाशिक 10 सप्टेंबर : नाशिक ( Nashik ) तसं पाहिलं तर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तसं ते खाद्यपदार्थांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला मिळतात. त्यामुळे नाशिक शहरातील खाद्यपदार्थांची ठिकाणे नेहमीचं चर्चेत येत असतात. अशातच नाशिकच्या ओझर जवळील दहाव्या मैलावर 75 वर्षांच्या भीमाबाई जोंधळे या आजीबाईनी सुरू केलेले 'हॉटेल रिलॅक्स कॉर्नर' ( Hotel Relax Corner ) सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळावी यासाठी भीमाबाई जोंधळे आजीबाईनी आपल्या हॉटेलमध्ये चमचमीत जेवणासोबत अस्सल दर्जेदार पुस्तकांची देखील मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. चला तर मग या हॉटेल रिलॅक्स कॉर्नर बद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
हॉटेल रिलॅक्स कॉर्नर मध्ये बसल्यानंतर जणू ग्रंथालयात बसल्याचा भास होतो.अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी या अनोख्या उपक्रमाची मांडणी केली आहे. त्यात त्यांना त्यांचा मुलगा प्रवीण आणि सूनबाई प्रीती यांची ही मोलाची साथ मिळाली आहे. हॉटेलच्या भिंती नाशिकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देतात. तुम्हाला हवं ते पुस्तक इथं वाचायला मिळतं. जेवणासोबत खवय्ये पुस्तकं वाचण्याचा ही भरभरून आनंद घेतात. तुम्ही बसलेल्या टेबलवरती चार ते पाच पुस्तकं वेगवेगळी ठेवलेली असतात. ती जर तुम्हाला आवडली नाहीत तर शेजारी असलेल्या अलमारीतून तुम्ही हवं ते पुस्तक घेऊ शकतात. विविध प्रकारची असंख्य पुस्तकं त्यांनी खवय्यांना उपलब्ध करून दिली आहेत.
हेही वाचा : VIDEO : शेकडो वर्षांपासून विसर्जनच नाही, जाणून घ्या बाराभाई गणपतीचा रंजक इतिहास
या पुस्तकांचा समावेश
बाळाची नाती, फिंद्री, मी आपला उगीचच, माती, सावित्री, सुविचार, सांज किरणे, जागृती, दिंडी निघणार आहे, विचार धन, लोकरंग नाट्यरंग, ज्ञानज्योती, अस्वस्थ कल्लोळ, अवर्त, भारतीय शासन राजकारण, एका गावाची गुलाबी गोष्ट, दारणाकाठच्या पाऊलखुणा, मातीची मुळाक्षरे, चंद्रकोर, तिमिर मौन, माझ्या मनाच्या अंतरी, मुगधायनी, हुंदका, कविता अंतरीच्या, शोषण यांसारखे अनेक पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत.
गरिबीचे चटके सोसले आणि कल्पना सुचली
भीमाबाई जोंधळे आजीबाईनी अतिशय गरिबीतून दिवस काढले आहेत. भीमाबाई सांगतात की, 72 सालच्या दुष्काळात पुरेसं अन्न देखील खाण्यासाठी मिळत नव्हतं. त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. तेव्हा नाशिक शहर इतकं विकसित नव्हतं फार दुर्मिळ घर होती. शेतीत ही काही चांगल पिकत नव्हतं त्यामुळे काय करावं घर कस चालवाव असा प्रश्न माझ्यासमोर होता. तेव्हा मी या ठिकाणी एक छोटीशी चहाची टपरी सुरू केली, तेव्हापासून व्यवसाय करावा असं वाटत होतं.
पण व्यवसाय चालेल की नाही याची शास्वती नव्हती. पण मी आणि मुलगा प्रवीण ने अस ठरवलं की आपण काही तरी वेगळ करूया ज्यामुळे समाजात देखील चांगला संदेश जाईल. प्रवीणला आणि मला अगोदर पासूनच वाचनाची आवड होती. त्यामुळे वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळेल या हेतूने आम्ही या हॉटेल मध्येच पुस्तकं ठेवण्याचा विचार केला आणि अखेर उपक्रम राबवला मात्र बघता बघता तो लोकांच्या पसंतीस उतरला.
हेही वाचा : पुण्यातील मानाच्या गणपतींना मुस्लीम बांधवांकडून अभिवादन, पाहा VIDEO
पिठल भाकरी फेमस
भिमाबाईच्या हातची पिठलं- भाकरी चांगलीच फेमस आहे त्या स्वतः बनवतात. नागलीच्या, बाजरीच्या भाकरी, झणझणीत पिठलं हे खवय्यांना त्यांच्या हातचं खूप आवडतं. अनेक जण बऱ्याच दूरवरून पिठलं -भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. त्या चुलीवर बनवत असल्याने त्याला एक वेगळीच चव असते त्यामुळे फेमस आहे.
कुठे आहे रिलॅक्स कॉर्नर हॉटेल
नाशिक शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर ओझर जवळ दहाव्या मैलावर हे हॉटेल आहे. अधिक माहितीसाठी 99229 46622 या नंबरवर संपर्क करू शकता.
गुगल मॅपवरून साभार
हा उपक्रम बघून खूप आनंद झाला
मी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो. मात्र, मला असं कुठे ही बघायला मिळालं नाही. वाचन संस्कृतीला प्रेरणा देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. हॉटेलमध्ये बसल्यानंतर एका जागेवर बसून विविध प्रकारची माहिती मिळते. हॉटेलच्या भिंती नाशिकचे धार्मिक,ऐतिहासिक महत्त्व दाखवून देतात. प्रत्येक टेबलावर पुस्तकं आहेत. खूप छान उपक्रम आहे.अशी प्रतिक्रिया खवय्ये चेतन पाटील यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Local18, Local18 food, Nashik