नाशिक 3 सप्टेंबर : नाशिक ( Nashik city ) शहरातील फुलेनगर परिसरात सध्या प्रचंड घाणीचे साम्राज्य वाढले असून, रोगराईला आमंत्रण दिले जात आहे. ठिकठिकाणी पडून असलेला कचरा ( Garbage ) जमा करण्यासही कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिक प्रशासनावर संतप्त झाले आहेत. वेळेवर घंटागाडी येत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. एकीकडे नाशिक स्मार्ट शहर म्हणून प्रगती करत असताना दुसरीकडे शहरातच अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्यांचे ढीग तयार झाले आहेत. अगदी रस्त्याच्या कडेलाच नाल्यात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या सोबतच मोकाट जनावरांनी उच्छाद मांडल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
हेही वाचा : Ganeshotsav 2022 : नाशिककरांनी पाहिलेच पाहिजेत असे टॉप गणपती, प्रत्येक बाप्पा आहे खास
कचरा हटवण्याची नागरिकांची मागणी गेल्या 3 महिन्यांपासून हा कचरा येथेच पडून आहे. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तसेच वराह, मोकाट जनावरे आणि श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक भटके श्वान लहान मुलांवर चाल करत असल्याच्या घटना ही समोर आल्या आहेत. महानगरपालिका कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर फक्त हो म्हणून सांगतात. मात्र, कचरा काही उचलली जात नाही. प्रशासनाने एक चांगली कचरा कुंडी जरी येथे बनवली तरी हा प्रश्न मार्गी लागू शकतो. स्थानिक नागरिक त्याच कचरा कुंडीत कचरा टाकतील. असं नियोजन करणे आवश्यक असल्याची माहिती स्थानिक नागरिक किसन लहामगे यांनी दिली आहे. घाणीचे सम्राज्य वाढल्यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ ही घाणकचरा उचलण्याची गरज असल्याची मागणी स्थानिक नागरिक नितीन धात्रक यांनी केली आहे. सबंधित स्वच्छता निरीक्षकांना तात्काळ लक्ष घालण्याच्या दिल्या सूचना जर अशी घाण कुठे पडली असेल तर ती तात्काळ साफ करण्यात यावी नागरिकांचं आरोग्य महत्वाचं आहे. असा हलगर्जीपणा कुठे दिसून आला असेल तर त्याची ही माहिती घेतली जाईल आणि मी स्वतः सबंधित स्वच्छता निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत. तात्काळ साफ सफाई केली जाईल, अशी माहिती महानगरपालिका घन कचरा विभाग संचालक आवेश पल्लोड यांनी दिली आहे.