जळगाव, 8 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर आज मतमोजणी होत आहे. यात भाजपला गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे. मतदानाचा पहिला टप्पा 1 आणि दुसरा टप्पा 5 डिसेंबरला पार पडला. या निवडणुकीत अनेक दिग्गज मैदानात उतरले. त्यात महाराष्ट्राच्या खान्देशातील माहेर असलेल्या आमदार संगीता पाटील या तिसऱ्यांदा गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत उतरल्या होत्या.
या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार संगिता पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा लिंबायतची जागा राखली आहे. ती जागा राखण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांचा पराभव केला. संगिता पाटील यांना 51363 तर काँग्रेसचे गोपाळ पाटील यांना 20018 मते मिळाली.
तर आम आदमी पक्षाचे उमेदवार पंकजभाई तायडे यांना 21718 मते मिळाली. भाजप उमेदवार संगिता पाटील यांनी 29645 मतांनी ही जागा जिंकली. गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या 182 जागांसाठीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. लिंबायत जागेसाठी पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला मतदान झाले होते.
लिंबायत मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार संगीता पाटील यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने गोपाळभाई देविदास पाटील आणि आम आदमी पक्षाने पंकज तायडे यांना उमेदवारी दिली. याआधीही 2012 आणि 2017 मध्ये लिंबायतची जागा भाजपने जिंकली होती.
संगीता पाटील याचं माहेर जळगाव जिल्ह्यातील हे गाव -
आमदार संगीता राजेंद्र पाटील यांचे माहेर हे खान्देशच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सारवे बुद्रुक हे गाव आहे. सुरतमधील लिंबायत मतदार संघातून त्या तिसऱ्यांदा आपले नशीब आजमवणार आहेत. त्यांचे वडील डहाणू येथे पोलीस दलात कार्यरत होते. तर त्यांचा एक भाऊसुद्धा पोलीस दलात आहे. तसेच त्यांचे एक दुसरे भाऊ हे व्यवसाय करतात.पाचोरा तालुक्यातील सारवे बुद्रूक प्रभ या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. त्यांना दोन बहिणीही असून दोन्ही विवाहीत आहेत. आमदार संगीता पाटील याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. गुजरात विधानसभेत आतापर्यंत त्या दोनवेळा भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
हेही वाचा - Gujarat Election Result: ठरलं तर! हे असणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपची घोषणा
आता पक्षाने त्यांना पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा तिकीट देऊन लिंबायत या त्यांच्या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यात आमदार संगीता पाटील यांनी हॅटट्रिक मारुन पुन्हा गुजरात विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश केला आहे. यानिवडणुकीकडे खान्देशवासियांचे लक्ष लागले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Gujrat Assembly Election, Jalgaon, Mla, Politics, Woman in politics