नाशिक, 22 ऑक्टोबर : मुंबईमध्ये मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सव उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे महायुतीची चर्चा रंगली आहे. पण, ‘याकडे राजकारण म्हणून बघण्याचं कारण नाही पण राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं’ असं म्हणत भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीचे संकेत दिले. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गिरीश महाजन यांनी मनसे आणि भाजपच्या युतीवर मोठं भाष्य केलं आहे. मुंबईत दिवाळीच्या निमित्ताने दीपोत्सव कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आले होते. पण याकडे राजकारण म्हणून बघण्याचं कारण नाही. पण राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं, असं म्हणत गिरीश महाजन यांनी सेना-भाजप-मनसे महायुतीचे संकेत दिले आहे. (उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, मुख्यमंत्री शिंदेंच्या खास आमदाराला देणार शह?) आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप विजयी होणार आहे. त्यामुळे आमचीच सत्ता येणार आहे. एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र आहोत. पण मनसेबाबत पक्ष श्रेष्टी काय तो निर्णय घेतील, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. ‘मिलिंद नार्वेकर आणि अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहे. मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर नाराज आहे. शिवसेनेत कोण राहील कोण जाईल सांगता येत नाही’ असं सूचक वक्तव्यही महाजन यांनी केलं. (Supriya Sule : ‘आमच्या कामाचे श्रेय घेऊ नका त्यावर…’ अजित दादांची सही सुप्रिया सुळेंचा रोख कोणावर?) छगन भुजबळ पालकमंत्री असतानाच नाशिकमधील टोल बंद करण्याचा निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं. खड्ड्यांमुळे मला देखील आज ट्रेनने यावं लागलं. मात्र खड्डयांबाबत मी देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्याशी देखील बोललो आहे. लवकरात लवकर काम करण्याशिवाय गत्यंतर नाही. नितीन गडकरी यांच्याशी देखील मी बोलणार आहे, असं आश्वासनही महाजन यांनी दिलं. ‘काँग्रेसला आता तडफदार नेतृत्व मिळालं आहे. काँग्रेसने भारत जोडी यात्रा केली नसती केली तर झाकली मूठ राहिली असती. काँग्रेसला काम राहिलेलं नाही. टीका टिप्पणी करण्याशिवाय काही राहील नाही, अशी टीकाही महाजन यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.