रत्नागिरी, 24 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना संगमेश्वर येथून रत्नागिरी पोलिसांनी अटक (Union Minister Narayan Rane arrsted) करुन जवळील पोलीस स्टेशनमध्ये नेलं आहे. यावेळी भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना नारायण राणे साहेबांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त (BJP leader expressed fear) केली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रसाद लाड?
ज्या पद्धतीने अटक केली आहे ती निषेधार्ह आहे. नारायण राणे हे लोकप्रतिनिधी आहेत, केंद्रात मंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. राणेसाहेब जेवत असताना त्यांना धक्काबुक्की केल्याचं माझ्याकडे फूटेज आहे. त्यांना खेचलं, त्याचा व्हिडीओ मी काढला आहे. अतिशय दुर्दैवी पद्धतीने कॅबिनेट मंत्र्यांसोबत जे वर्तण केलं ते निषेधार्ह आहे. या प्रकऱणी एसपी बोलायला तयार नाहीयेत. आम्हाला अशी भीती आहे की राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे.
राणे साहेबांना सहा वाजेपर्यंत अशाच प्रकारे ताटकळत ठेवत नंतर त्यांना अटक करण्यात येईल. यानंतर रात्री त्यांचा छळवाद हा देखील कदाचित प्रयत्न या सरकारचा असू शकतो. मला कुणीतरी सांगितलं की एका वरिष्ठ मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे ज्याने एसपींवर दबाव टाकला की काहीही करा आणि अटक करा. मला असं वाटतं की, राजकीय लढाई राजकारणाने लढली पाहिजे, विचारांची लढाई विचाराने, तत्वाची लढाई तत्वाने लढली पाहिजे आणि न्यायाची लढाई न्यायाने लढली पाहिजे असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
प्रसाद लाड पुढे म्हणाले की केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांना नुसतेच बसवून ठेवले आहे. ना कुठली कारवाई करत आहेत ना कसली माहिती देत आहेत. गोळवली प्रकल्पात श्री नारायण राणे यांना पोलिसांनी भरल्या ताटावरून जेवताना अर्धवट उठवले असेही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांनी एफआयआर केला असे सांगितले जाते, ते पोलिस स्थानकात उपस्थित नाहीत.
नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजपने घेतला मोठा निर्णय
नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केल्यावर भाजप नेते प्रमोद जठार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, नारायण राणेंनी काढलेली जनआशीर्वाद यात्रा आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. तसेच नारायण राणेंची सुटका होत नाही तोवर भाजप आंदोलन करत राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
ज्या दिवशी राणे साहेबांची सुटका होईल त्या दिवशी जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती सुद्धा यावेळी प्रमोद जठार यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिली आहे.
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. नारायण राणे आणि भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पेटल्याचं दिसत आहे. संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद उमटत असल्याचं दिसत आहे. रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंना अटक गेल्यानंतर आता न्यायालयात हजर करणार का? हे पहावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane