संगमेश्वर, 24 ऑगस्ट : जनआशीर्वाद यात्रे दरम्यान महाड येथे पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ही टीका करताना नारायण राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर नारायण राणेंच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायलयाने फेटाळला आणि अखेर राणेंना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे.
नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केल्यावर भाजप नेते प्रमोद जठार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, नारायण राणेंनी काढलेली जनआशीर्वाद यात्रा आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. तसेच नारायण राणेंची सुटका होत नाही तोवर भाजप आंदोलन करत राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
ज्या दिवशी राणे साहेबांची सुटका होईल त्या दिवशी जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती सुद्धा यावेळी प्रमोद जठार यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिली आहे.
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. नारायण राणे आणि भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पेटल्याचं दिसत आहे. संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद उमटत असल्याचं दिसत आहे. रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंना अटक गेल्यानंतर आता न्यायालयात हजर करणार का? हे पहावं लागणार आहे.
काय म्हटले होते नारायण राणे?
जनआशीर्वाद यात्रे दरम्यान पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले होते, शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना कोणताही निर्णय घ्याचा असेल तर तो मातोश्रीला विचारूनच घ्यावा लागतो, त्यांना मी फोन करणार आहे. शिवसेनेत ते फक्त नावापुरते मंत्री राहिले आहेत. एकही फाईल एकनाथ शिंदे यांना मातोश्रीला विचारल्या शिवाय सही करता येत नाही. जर ते आमच्याकडे आले तर स्वागतच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane