अमरावती, 20 ऑगस्ट : अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकाने विद्यादानाचे कार्य सोडून विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी असल्याचे सांगितले. तसेच दारू पिऊन खुर्चीवर झोपला आणि दारुछ्या नशेत तिथेच लघूशंका केली. याप्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - अमरावतील जिल्ह्यातील धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा काकरमल येथे हा धक्कादायक प्रकार घडला. येथील शिक्षक पृथ्वीराज नेत्रराम चव्हाण (वय 38) याने दुपारी शाळेत हजर विद्यार्थ्यांना शाळेला सुटी झाल्याचे सांगितले. यानंतर मस्त दारू पिऊन खुर्चीवर झोपून गेला व तिथेच लघुशंका केली. हा प्रकार विद्यार्थ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. यानंतर पालकांनी या शिक्षकाचा समाचार घेतला असता उलट तो पालकांवरच दादागिरी करत होता. याबाबतचा व्हिडिओ शुट करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळा काकरमल येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. याठिकाणी गावातील 200 विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच 4 शिक्षक या शाळेत कार्य करत आहेत. त्यापैकी एक शिक्षका प्रसूती रजेवर आहे. त्यामुळे अन्य 3 शिक्षक शाळेत कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास या 3 पैकी एक सहायक शिक्षक पृथ्वीराज चव्हाण हा शाळेत दारू पिऊन आला. तसेच त्याने यावेळी त्याच्या वर्गातील विद्यार्थांना आज शाळेला सुटी असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर विद्यार्थांना बाहेर हाकलून दिले. यानंतर स्वतः वर्गातील खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवून तेथे झोपला आणि तो दारुच्या इतक्या नशेत होता की त्याने त्याठिकाणी झोपेतच लघुशंका केली. त्यावेळी उपसरपंच अशोक कासदेकर पालक वर्ग सुरेंद्र पटोरकर, भुरेलाल बेठेकर शाळा वयवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जांभेकर उपाध्यक्ष नंदलाल जावरकर हे शाळेत पोहचले. शाळेत शिक्षक पृथ्वीराज चौहान हा दारूच्या नशेत खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवून तेथेच लघुशंका केलेल्या अवस्थेत आढळला. हेही वाचा - भर वर्दळीच्या ठिकाणी 35 वर्षीय महिलेचा खून, गोंदियातील सुरक्षा रामभरोसे? हादरवणारी घटना यावेळी पालकांनी त्याला झोपेतून उठवल्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवता, आज सुटी का दिली अशी विचारणा केली असता. तो त्यांच्यावरच दादागिरी करत होता. याप्रकरणी त्याची व्हिडिओ शूटिंग करण्यात आली. याप्रकरणी या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत पालकांनी धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.