नागपूर, 14 एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लेस्बियन पार्टनर आणि तिच्या मैत्रिणीच्या छळाला कंटाळून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नागपुरातून समोर आली आहे. मुलीच्या आत्महत्या महिन्याभरापूर्वी झाली होती. मात्र, पोलीस तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी मृत विद्यार्थिनीच्या मैत्रिणीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - अंकिता (नाव बदललेले वय - 23) ही तांत्रिक प्रशिक्षण घेत होती. याच दरम्यान तिची वर्षभरापासून संध्या (नाव बदललेले वय 24) नावाच्या एका तरुणीशी मैत्री झाली होती. संध्याच अंकिताला कॉलेजला घेऊन जायची. याचदरम्यान, 6 मार्च रोजी होळीसाठी कॉलेज बंद होते. मात्र, तरी संध्याने अंकिताला कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्याचे सांगून तिच्या घरातून नेले. याच दिवशी अंकिताला लग्नासाठी पुण्याहून स्थळ बघायला येणार होते. त्यामुळे तिच्या आईने फोन केल्यावर अंकिताने 2 वाजता घरी येते, असे सांगितले. त्यानंतर साडेअकरा वाजेच्या सुमारास संध्याने अंकिताच्या कुटुबीयांना फोन केला आणि अंकिताने धंतोली पोलीस ठाण्याजवळील नाल्याजवळ विष घेतले असून, तिला हिंगणा येथील रुग्णालयात दाखल केले आहे, असे सांगितले. यानंतर अंकिताचे कुटुंबीय तातडीने तेथे पोहोचले. त्यांनी संध्याला धंतोलीऐवजी हिंगणा आतापर्यंत आणण्याबाबत विचारले असता यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, कॉलेजमध्ये कुटुंबीयांनी चौकशी केली आणखी धक्कादायक माहिती समोर आली. अंकिताने ज्यादिवशी आत्महत्या केली त्यादिवशी अंकिता आणि संध्यामध्ये वाद झाला होता, असे कळले. या वादानंतरच अंकिताने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तर अंकिताने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच अंकिताचा प्रियकर रुग्णालयात पोहोचला. त्याने 26 नोव्हेंबर 2019 रोजीच अंकितासोबत कोर्ट मॅरेज झाल्याची धक्कादायक माहिती दिली. नात्याबाबत कुटुंबात मतभेद असल्याने लग्नाची बाब लपविली, असे त्याने सांगितले. यानंतर एकच खळबळ उडाली. तर दुसरीकडे उपचारादरम्यान 11 मार्च रोजी अंकिताचा मृत्यू झाला. त्यावेळी सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पण पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर - दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांना तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी अंकिता आणि संध्या यांचे मोबाइल तपासले. यामध्ये संध्याने अंकितासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याची खळबळजनक माहिती समोर आली. अंकिताने तिच्या प्रियकरासोबत लग्न केल्याची माहिती संध्याला मिळाली. त्यामुळे तिने अंकितावर लग्न आणि प्रेमसंबंध तोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
तसेच स्वत:ला तृतीयपंथी असल्याचे सांगून संध्या अंकिताला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगायची. तू आत्महत्या केलीस तर तुझ्या घरचे लोक सुखी होतील, असे सांगून ती अंकिताला आत्महत्येसाठी प्रवृत्त करत होती. संध्याची सरिता (नाव बदललेले, वय - 20) या विद्यार्थिनीशी मैत्री आहे. सरितासुद्धा अंकितावर दबाव आणायची. अंकिताची प्रकृती जाणून घेण्याच्या बहाण्याने तीसुद्धा रुग्णालयात आली. अंकिता शुद्धीवर आली तर तिचे जबाब देण्याअगोदर माझ्याशी बोलणे करवून द्या, असे तिने अंकिताच्या कुटुंबीयांना सांगितले होते. तर अंकिताच्या नातेवाइकांनीही पोलिसांच्या चौकशीत अंकिता आणि संध्याच्या नात्याचे सत्य माहिती असल्याची कबुली दिली. या आधारावर सोनेगाव पोलिसांनी अंकिताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संध्या आणि सरिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.