मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur : शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्याला पालिका देणार बक्षीस, तुम्हालाही मिळू शकते संधी! पाहा Video

Nagpur : शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्याला पालिका देणार बक्षीस, तुम्हालाही मिळू शकते संधी! पाहा Video

वॉल पेंटिंग स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि व्यावसायिक चित्रकार, अशा दोन गटात घेण्यात येणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 15 नोव्हेंबर : शहराच्या स्वच्छता आणि  सुंदरतेत भर घालण्यासाठी नागपूर  महानगरपालिका विविध स्तरावर उपाययोजना राबवित आहे. त्याच अनुषंगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेने शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय व निमशासकीय इमारतीच्या संरक्षक भिंतीवर वॉल पेंटिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्या गटाला अनुक्रमे 50, 40, 30 हजार अशी रोख पारितोषिक आणि उत्तेजनार्थ 10,000 रुपयांचे पाच बक्षिसे देण्यात येणार आहे. 

वॉल पेंटिंग स्पर्धा ही 3 ते 5 डिसेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटाची तारीख 23 नोव्हेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या स्पर्धेत शहरातील चित्रकला महाविद्यालयातील  विद्यार्थी तसेच व्यावसायिक चित्रकारांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी  केले आहे.

विद्यार्थी आणि व्यावसायिक चित्रकारांना संधी

वॉल पेंटिंग स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि व्यावसायिक चित्रकार, अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. नागपुरातील ७ चित्रकला महाविद्यालयांच्या प्राचार्यासोबत चर्चा करून या स्पर्धेची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येत या स्पर्धेत भाग घेऊन शहर स्वच्छता आणि सौंदर्यात भर घालण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. स्पर्धेत स्वच्छ भारत अभियानावर आधारित 32 विषयाची यादी तयार करण्यात आली आहे. शहरातील शासकीय व निमशासकीय इमारतीच्या भिंतीवर 10 मीटर चित्र काढायचे आहे. तसेच खाजगी भिंतीवर देखील अनुमती असल्यास  त्यांच्या सहमतीने  चित्र काढता येणार आहे. याकरिता चित्रकाराला संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

अशी असतील पारितोषिके

स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा व कलावंताचा चार ते पाच संख्या असलेला एक गट तयार करून भित्ती चित्र काढायचे आहे. तसेच आपल्या क्षमतेनुसार हव्या तितक्या भिंतीवर स्पर्धक चित्रं काढू शकतात.  स्पर्धेसाठी लागणारे रंग, ब्रश इत्यादी साहित्य महापालिकेकडून पुरविण्यात येणार आहे. तसेच भिंतीवर पांढरा रंग मारून दिला जाणार आहे. स्पर्धेतील व्यावसायिक गटाला अनुक्रमे 50, 40, 30 हजार अशी रोख पारितोषिक आणि उत्तेजनार्थ 10000 रुपयांचे पाच बक्षिसे देण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे 35, 25,15 हजार अशी रोख पारितोषिक आणि 10000 रुपयांचे उत्तेजनार्थ 5 पारितोषिक देण्यात येणार आहे, यासह सहभागी प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Nagpur : देशभर दरवळतो उमरेडच्या अगरबत्तीचा सुगंध, पाहा Video

शासकीय चित्रकला महाविद्यालयात नोंदणी

चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयात स्पर्धेची नोंदणी करता येणार आहे. तर व्यावसायिक चित्रकारांनी दीक्षाभूमी जवळील शासकीय चित्रकला महाविद्यालयात नोंदणी करता येणार आहे. पुरस्कारांची निवड पुरस्कार निवड समितीतर्फे करण्यात येणार आहे. पुरस्कार  वितरणाची तारीख व दिवस विजेत्यांना मोबाईलद्वारे कळविण्यात येणार असल्याचे माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. 

स्पर्धेद्वारे शहरातील सौंदर्य व स्वच्छतेत भर घालण्यात येणार असून शासकीय व निमशासकीय परिसरातील शोभा व भिंतींचे आयुष्य वाढणार आहे. शहरातील चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  व व्यावसायिक चित्रकारांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धेचे समन्वयक राजकुमार बोबाटे (9923594771 व 1518581003) तसेच सूर्यकांत मंगरूळकर यांच्याशी (9422810934 व 8208873825) यावर संपर्क करता येईल.

First published:

Tags: Local18, Nagpur