जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur : देशभर दरवळतो उमरेडच्या अगरबत्तीचा सुगंध, पाहा Video

Nagpur : देशभर दरवळतो उमरेडच्या अगरबत्तीचा सुगंध, पाहा Video

Nagpur : देशभर दरवळतो उमरेडच्या अगरबत्तीचा सुगंध, पाहा Video

उमरेड येथे ऊदबत्ती क्लस्टरची निर्मिती करण्यात आली आहे. येथे तयार होणारी ऊदबत्ती देशभरात विक्रीसाठी जात आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 12 नोव्हेंबर : कुठलाही धार्मिक उत्सव असो वा, सण पूजाविधी ऊदबत्ती लावूनच मनोभावे प्रार्थना केली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत पूजेच्या वेळी फुलांबरोबरच ऊदबत्ती, धूप, कापूर प्रज्वलित करण्यालाही तेवढेच महत्त्व आहे. नागपूर शहरालगतच्या भागात अगरबत्ती उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. नागपूरसह शहरालगतचा भाग हा ऊदबत्तीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. उमरेड येथे ऊदबत्ती क्लस्टरची निर्मिती करण्यात आली आहे. येथे तयार होणारी ऊदबत्ती देशभरात विक्रीसाठी जात आहे.   आज घडीला लहानमोठे अनेक अगरबत्ती उत्पादक हा व्यवसाय करताना आढळून येतात. मात्र विखुरलेल्या अवस्थेत असलेल्या या अगरबत्ती उद्योगांना एका छताखाली आणण्याचे काम उमरेड येथील अगरबत्ती क्लस्टरने केले आहे. या क्लस्टरमुळे अगरबत्ती उत्पादनाला गती प्राप्ती होऊन अनेकांना यामुळे रोजगार निर्माण झाला आहे. शहरात ठिकठिकाणी अगरबत्ती उद्योग असल्याने मोठ्या कंपन्यांच्या मागणीची पूर्तता होत नव्हती. त्यामुळे अशा क्लस्टरद्वारे ही उणीव भरून काढता येईल हे लक्षात घेता या क्लस्टरची निर्मिती करण्यात आली आहे. उमरेड सारख्या ग्रामीण भागात लहानमोठे ऊदबत्ती उत्पादकांना एका छताखाली आणण्यासाठी उमरेड येथे नागपूर अगरबत्ती क्लस्टर असोसिएशन सुरू करण्यात आले. वर्षभरापूर्वी येथील क्लस्टर सुरू झाले असून येथे सध्या ऊदबत्ती उत्पादित करणारे 42 स्वतंत्र युनिट कार्यरत आहेत. यालगतच सामूहिक सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राद्वारे अगरबत्तीसाठी लागणाऱ्या काड्या, परफ्युमिंग पॅकेजिंग इत्यादी तयार होतात. या सर्वांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऊदबत्तीचे उत्पादन होत आहे. महिलांसाठी उभारले क्लस्टर क्लस्टरची वैशिष्ट्य असे की, महिलांनी महिलांसाठी उभारलेले हा प्रकल्प असून 90 टक्के महिला क्लस्टरमध्ये कार्यरत आहेत. आज घडीला आठशे ते हजार लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या या प्रकल्पाद्वारे रोजगार मिळाला आहे. या क्लस्टरच्या माध्यमातून सायकल आणि आयटीसी या भारतातील दोन मोठ्या कंपन्यांना ऊदबत्ती निर्यात करण्यात येते. प्रति महिना शंभर मेट्रिक टन ऊदबत्ती त्यांना देण्यात येते. तर पुढे प्रति महिना शंभर मेट्रिक टन ऊदबत्तीचा पुरवठा करण्याचा आमचा मानस असल्याचा नागपूर अगरबत्ती क्लस्टर असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भरणे यांनी सांगितले. Video : 7 इंचाची बाहुबली पाणीपुरी, एका घासात खाल्ली तर मिळते बक्षीस! चीनमधील अगरबत्ती काड्यांना स्वदेशी पर्याय   आज घडीला उमरेड येथील क्लस्टरमध्ये चीनहून येणाऱ्या अगरबत्ती काड्यांवर कोटिंग करून ती अगरबत्ती परफ्युमिंगसाठी कंपन्यांकडे पाठविण्यात येते. मात्र भविष्यात क्लस्टर असलेल्या जागेवरच सामूहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून बांबूपासून ऊदबत्तीसाठी काडी बनविणे, तिचे परफ्युमिंग, पॅकेजिंग, प्रिंटिंग होणार आहे. सध्या बहुतांश जागी भारतात अगरबत्तीसाठी लागणारी बांबू ही चीनमधून आयात होते. चीनमधील या आयातीला पर्याय म्हणून ईशान्येकडील राज्यातील बांबू मागविण्यात येणार आहे. परिणामतः भारतातील मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला हातभार लागणार आहे. चीनकडून होणारी आयात थांबून उमरेडला तयार झालेली पूर्णतः स्वदेशी ऊदबत्ती देशविदेशात पोहचणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शासन दरबारी विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा उपयोग या क्लस्टरच्या निर्मितीसाठी करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना इत्यादींचा या क्लस्टरला फायदा झाला आहे. भविष्यात अगरबत्तीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून उमरेडची अगरबत्ती देशविदेशात निर्यात करण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती नागपूर अगरबत्ती क्लस्टर असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भरणे यांनी दिली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , nagpur
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात