मुंबई, 26 मे : काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीत जाऊन हायकमांडची भेट घेतली आहे. या नेत्यांमध्ये विजय वडेट्टीवार, सुनील केदार, शिवाजीराव मोघे आणि संजय निरुपम यांचा समावेश आहे. काँग्रसला वाचवायचं असेल तर नाना पटोले यांना हटवा अशी मागणी या नेत्यांनी हायकमांडकडे केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान याबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना विचारले असता त्यांनी मात्र काँग्रेसमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचं म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार विजय वडेट्टीवार यांनी भेटीबाबत खुलासा केला आहे. मी दिल्लीला पक्षश्रेष्टींना भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र ही सदिच्छा भेट होती. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांनादेखील भेटण्यासाठी गेलो होतो, मात्र त्यांची भेट झाली नाही. कर्नाटकात मोठा विजय मिळवला, त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो. काँग्रेसमध्ये कुठलीही खदखद नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
‘काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही’ ते पुढे बोलताना म्हणाले की, मी आधी दिल्लीत गेलो होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनील केदार आले. आम्ही वेगवेगळ्या भेटी घेतल्या. प्रदेश अध्यक्षांनी कारवाई केली होती, त्यासंदर्भात आम्ही आधीच वरिष्ठांना कळवलं होतं. आता तो विषय नाही. त्यांनी कारवाई करताना सर्वांना आधी विश्वासात घ्यायला हवं होतं, मी याविषयी आधीच प्रदेशाध्यक्षांशी बोलल्यामुळे आता कुठलीही खदखद नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.