विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 6 एप्रिल: 20 दिवसांपूर्वी म्हणजेच 16 मार्च 2023 रोजी शोध लागलेल्या एक लघुग्रह 6 एप्रिलला पृथ्वीजवळून जाणार आहे. खगोल शास्त्रज्ञांनी या लघुग्रहाला ‘2023 एफएम’ असे नाव दिले असून त्याचा आकार 200 मीटर व्यासाचा म्हणजे तब्बल 90 हत्तीच्या आकरा एवढा असल्याचे बोलले जात आहे. हा लघुग्रह चंद्राच्या कक्षेबाहेरून जाणार असल्याने चंद्राच्या गुरूत्वकर्षांमुळे लघुग्रहाची दिशा भरकटण्याची चिन्हे आहेत. मात्र, तो पृथ्वीच्या दिशेने येणार नसल्याचे नागपुरातील खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. खगोलीय खटनांबाबत उत्सुकता आकाशगंगेत असंख्य ग्रह, तारे, उपग्रह, लघुग्रह इत्यादींसारख्या असंख्य घटकांचा समावेश असतो. दिवसागणिक या ग्रह ताऱ्यांच्या मध्ये विलक्षण हालचाल अथवा काही खगोलीय घटना घडत असतात. जगभरातील शास्त्रज्ञ, खगोल अभ्यासक या गोष्टीकडे लक्ष देऊन असतात. कारण त्या घटनेचा आपल्या मानवी जीवनाशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या संबंध असतो. अशीच एक खगोलीय घटना आज 6 एप्रिलला घडणार आहे.
लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार ‘2023 एफएम’ हा 200 मीटर व्यासाचा लघुग्रह आज पृथ्वीजवळून जाणार आहे. गेल्या काही वर्षात पृथ्वीजवळून जाणाऱ्या लघुग्रहांपैकी हा सर्वांत मोठा लघुग्रह आहे. ‘2023 एफएम’ लघुग्रह 16 किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने जात असून तो पृथ्वीजवळून जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा लघुग्रह चंद्राच्या कक्षेबाहेरून जाणार आहे. चंद्राच्या गुरूत्वकर्षांमुळे लघुग्रहाची दिशा भरकटण्याची चिन्हे आहेत. मात्र, तो पृथ्वीच्या दिशेने येणार नसल्याचे मत खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. 16 मार्चला लागला लघुग्रहाचा शोध नुकतेच 16 मार्चला ‘2023 एफएम’ नावाच्या लघुग्रहाचा शोध लागला. हा लघुग्रह पहिल्यांदाच 6 एप्रिलला पृथ्वीजवळून जाणार आहे. त्यामुळे हा खागोल अभ्यासक, शास्त्रज्ञ आणि खगोल प्रेमींसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. पृथ्वी व चंद्र आपल्या गुरुत्वाकर्षणाद्वारे लघुग्रहाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू शकतात. या लघुग्रहाचा मार्ग न भरकटल्यास तो सरळ जाऊन पुढे पृथ्वी प्रदक्षिणा करणार किंवा पुन्हा सौरमालेला वेढा देऊन निघून जाईल. नासा या घटनेकडे लक्ष ठेवून आहे. मान्सूनबाबत हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट, यंदा पाऊस कसा राहणार? लघुग्रह पृथ्वीकडे येण्याची शक्यता नाही सध्या तरी हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किमान दोन किलोमीटर परिसरात हानी होईल. या पूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार मध्ये 50 हजार वर्षांपूर्वी अशीच एक उल्का कोसळली होती. यानंतर मोठी हानी झाली होती. या घटनेची आठवण यानिमित्ताने पुन्हा एकदा ताजी झाली आहे.