भंडारा, 3 डिसेंबर : गेल्या महिनाभरापासून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेनिमित्त राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी सुषमा अंधारे यांना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून एक अनोखी भेट देण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्यासह त्यांच्या मुलीचा फोटो भेट दिला. हा फोटो पाहून सुषमा अंधारे भावूक झाल्या. महिनाभरापासून त्या राज्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना त्यांच्या मुलीला भेटता येत नाहीये. त्यांनी जेव्हा हा फोटो पाहिला तेव्हा आपल्या मुलीच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले. त्या भरसभेत रडल्याचं पहायला मिळालं.
शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल
या सभेत सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना देखील टोला लगावला. राज्यातील शिंदे,फडणीस सरकार जानेवारी महिन्यात कोसळणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भोंडेकर हे विदर्भातील माझे सर्वात लाडके भाऊ आहेत. त्यांना नक्कीच भेटणार असून, नरूभाऊ येणारी निवडणूक जिंकणार नाहीत. भंडारा येथून मी निवडणूक लढवण्यापेक्षा या जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारीच भोंडेकरांसाठी त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सक्षम असल्याचा घणाघात अंधारे यांनी केला आहे.
निती आयोगावरू टोला
दरम्यान यावेळी अंधारे यांनी नीती आयोगावरून देखील सरकारला टोला लगावला आहे. महारष्ट्र तोडण्याची भाषा करण्यापेक्षा राज्य सरकारने राज्य जोडण्याची भाषा करावी. विकास कामांवर लक्ष दिले पाहिजे. नीती आयोगाला सल्ला देण्यासाठी मित्र नावाची संस्था तयार केली. मुख्यमंत्री यांचे मित्र अजय अशर यांना मुख्य कार्यकारी पदावर बसविले. अशर यांना बांधकाम विभागाचा अनुभव असताना त्यांना नीती आयोगाची जबाबदारी देण्यात आली. यावरून राज्य सरकारची जखम पायाला आणि मलम डोक्याला अशी भूमिका दिसून येते. या माध्यमातून विदर्भ वेगळा करण्याची देवेंद्र फडणवीस यांची नीती असल्याचा आरोपही आंधरे यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.