वाशिम, 18 जून, किशोर गोमाशे: जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारंजा ते शेलू बाजारदरम्यान ढाकली किनखेड परिसरात समृद्धी महामार्गावर सात ते आठ जणांच्या टोळक्यानं प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स बस लुटण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास घडली. यावेळी बस लुटण्याच्या उद्देशानं टोळक्याकडू बसवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक होताच चालकानं बसचा वेग वाढवून ती पुढे काही अंतरावर नेऊन थांबवली. अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पसार ट्रॅव्हल बस थांबल्यानं मागून येणारी वाहने देखील थांबली, त्यामुळे हे दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या दगडफेकीत ट्रॅव्हल्स च्या कॅबिनमध्ये चालकाच्या विरुद्ध बाजूस बसलेल्या दयाराम राठोड यांना दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी यवतमाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान ट्रॅव्हल्समधील इतरही काही प्रवासी या दगडफेकीत किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांमध्ये दहशत या घटनेनं प्रवाशांमध्ये दहशत पसरली असून, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. समृद्धी महामार्गावर दोनद ते शेलू बाजारदरम्यान पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्यानं घडत आहेत. या महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र आता त्यात भर म्हणजे वाहनांवर दगडफेक देखील होऊ लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.