विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 03 फेब्रुवारी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या दोन चरणांच्या गीताला महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मूळचे नागपूरकर असलेले कविवर्य राजा बढे यांच्या गीताला हा सन्मान मिळाल्याबद्दल समाधानाचे स्वर नागपुरातून उमटत आहेत.
1.41 मिनिट अवधीचे हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 19 फेब्रुवारी 2023 पासून अंगीकारण्यात येणार आहे. शाहीर अमीर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजाने गायलेले आणि त्यांच्या पहाडी आवाजाने अजरामर केलेले हे गीत राजा बढे यांनी लिहिले असून संगीतकार श्री शिवा श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केले आहे.
राज्यगीत म्हणून मंजुरी
विशेषत: सीमा लढ्यापासून आंदोलकांना,मराठी माणसाला हे गीत स्फूर्ती,प्रेरणा आणि चेतना देणारे ठरले होते. आजही हे गीत नव्या पिढीच्या तरुणाईत देखील त्याचं तोडीने गाजते आहे. नागपूरचे कवी राजा बढे यांचा जन्म नागपुरात 1 फेब्रुवारी 1912 रोजी झाला होता. राज्य सरकारने या गीताला राज्यगीत म्हणून मंजुरी दिली. यामुळे नागपूरकर गीतकार राजा बढे आणि पर्यायाने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सुरुवातीचा काळ नागपुरात
महाराष्ट्रातील प्रख्यात कवी म्हणून पुढील काळात नावरूपास आलेले नागपूरकर राजा बढे यांचा सुरुवातीचा काळ नागपुरातच गेला. त्यांचे माध्यमिक शिक्षण नागपुरातील टिळक विद्यालयात झाले आहे. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात पत्रकारितेने झाली. त्यानंतर बरीच वर्षे त्यांनी आकाशवाणीला सेवा दिल्यावर त्यांनी चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. “स्वानंद चित्र’ ही संस्था उभी केली आणि ’रायगडचा राजबंदी’ हा संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट त्यांनी काढला.
शाळिग्राम शिळा अयोध्येत दाखल, जय श्रीरामाच्या जयघोषात झालं स्वागत
मराठी कवी अशी ओळख
त्याचवेळी ते नागपूरच्या बागेश्वरी मासिकाच्या संपादक मंडळातही जबाबदारी सांभाळत होते. तसेच साप्ताहिक सावधान मध्ये मावकर भावे यांच्यासोबतही त्यांनी काम केले. शिवाय त्यांनी शिक्षणासाठी नागपुरातच कॉलेजात प्रवेश घेतला मात्र वर्षभरात त्यांनी कॉलेज शिक्षण थांबविले. संपादक, चित्रपट निर्माते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक अशी चतुरस्र ओळख त्यांनी अल्पावधीतच निर्माण केली. तरीही त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. आजही त्यांच्या स्मृती नागपूरकरांनी जपल्या आहेत.
पन्नासच्या दशकातील गीत
नागपुरातील तुळशीबाग येथील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजा बढे यांचे दैवत होते. त्यांची असंख्य गीते गाजली. राजा बढे यांच्या नावे १८ कवितासंग्रह, ४ नाटके, ९ संगीतिका, ५ एकांकिका, एक कादंबरी आहे. शिवाय त्यांनी प्रसिद्ध साहित्याचे भावानुवाद देखील केलेले आहेत. पन्नासच्या दशकातील त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत गायक शाहीर साबळे यांनी अजरामर केले. या गीताची राज्य गीत म्हणून निवड झाल्याने कवीवर्य राजा बडे यांच्या नागपूरशी असलेला या घनिष्ठ संबंधांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.