नागपूर, 25 नोव्हेंबर : नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या प्रियांशू रवी क्षत्रिय या कलाकाराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर चोरी आणि घरफोडीचा आरोप आहे. प्रियांशूनं झुंड सिनेमात बाबू ही भूमिका केली होती. ती चांगलीच गाजली होती. नागपूरचे क्रीडा शिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित ‘झुंड’ हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. नागराज मंजुळे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी सिनेमासाठी अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली मुलं शोधून काढली. त्यांना थेट अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची संधी दिली. याच कलाकारांपैकी एक असलेल्या 18 वर्षांच्या प्रियांशूला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे प्रकरण? काही दिवसांपूर्वी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीतील प्रदीप हरबाजी मोडावे यांच्या घरी चोरी झाली होती. त्यावेळी चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 75 हजारांचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी एका अल्पवयीनासह दोघांना अटक केली होती. चौकशीदरम्यान या घरफोडीत प्रियांशूही सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस मागावर असल्याचे पाहून प्रियांशू काही काळ फरार झाला होता दरम्यान बाबू गड्डी गोदाम परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार मंगळवारी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याला 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शाळेतील वर्गखोलीतच दारू पिऊन मुख्याध्यापकाचा प्रताप, मेळघाटात शिक्षणाचा बट्ट्याबोळ प्रियांशूनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गड्डी गोदाम मधील कबुतरांच्या पेटीत लपवलेले दाग-दागिने पोलिसांनी जप्त केले बाबूंच्या चौकशीत आणखी काही घरफोड्याच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांशू गांजा पिताना आढळला होता. त्यावेळी सदर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली होती अशी माहिती मानकापूर पोलिसांनी दिली. झुंडमधील भूमिका गाजली झुंड सिनेमात प्रियांशूनं त्याच्या बोली भाषेनं अमिताभसह सर्वांनाच प्रभावित केले होते. चित्रपटाच्या निमित्तानं झालेल्या प्रमोशनल कार्यक्रमातही त्यानं खऱ्या आयुष्यातील किस्से सांगितले होते. नागराजनं हिरा शोधला अशीच भावना त्यावेळी व्यक्त करण्यात येत होती. नागराजचा हिरा आता काळवंडला अशीच भावना व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.