नागपूर, 4 जुलै: जगभरातील मत्स्योत्पादनात भारत पहिल्या तिघांमध्ये गणला जात असून अलीकडच्या काळात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायाला फार मोठी चालना मिळत असून खऱ्या अर्थाने ही एक निल क्रांती ठरत आहे. मत्स्य व्यवसाय हा देशातील कोट्यावधी जनतेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने रोजगाराचे महत्त्वाचे साधन बनले आहे. यामुळे भविष्यात मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाकरिता तसेच मत्स्य उत्पादन वाढविण्याकरता मत्स्य विज्ञान शाखेतील कुशल मनुष्यबळाची आणि पदवीधारकांची फार मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. मत्स्य विज्ञान शाखेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात आपले करिअर घडवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत याबद्दलच नागपूर मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन बोंडे यांनी माहिती दिली आहे.
रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध भारतात जागतिक दर्जाची लक्षनिय गुंतवणूक, बंदरे, रसद, आणि पुरवठा साखळीच्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. भारत सरकारची सक्रिय धोरणे गुंतवणूकदारांना अनुकूल प्रोत्साहन आणि उच्च कुशल मनुष्यबळ इत्यादीमुळे मत्स्य व्यवसायासारख्या व्यवसायाला खूप मोठी चालना मिळत आहे. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येणाऱ्या मत्स्य विज्ञान हे पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर आणि रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध आहे. इथं आहेत शासकीय क्षेत्रात नोकरीच्या संधी मत्स्य विज्ञान शाखेतील पदवीधारकांना महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागातील विविध पदांवर संधी आहेत. जिल्हा मत्स्य व्यवसाय आयुक्त सहाय्यक, आयुक्त मत्स्यव्यवसाय यांसारखे आणि इतर तत्सम राजपत्रित अधिकारी आणि अन्न आणि औषध प्रसाधन विभागांतर्गत अन्नसुरक्षा अधिकारी, राष्ट्रीयकृत बँकमध्ये कृषी विकास अधिकारी, राष्ट्रीय मत्स्यकी विकास महामंडळ, निर्यात तपासणी एजन्सी, महाविद्यालय तसेच केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक किंवा शास्त्रज्ञ म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत, अशी माहिती नागपूर मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन बोंडे यांनी दिली आहे.
खाजगी क्षेत्रासह आखाती देशांमध्ये मागणी खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्यामध्ये नोकरीच्या संधी आहेत. मत्स्य प्रक्रियेमध्ये गद्रे मरीन एक्सपोर्ट, हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड, खाद्य निर्मितीमध्ये अवंती फीड्स, लिमिटेड ग्रोवेल फिट्स, विविध अन्नप्रक्रिया उद्योग इत्यादी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व्यवस्थापक गुणवत्ता नियंत्रक पर्यवेक्षक संशोधन अधिकारी यांसारख्या पदावर मत्स्य विज्ञान शाखेतील पदवीधारकांकरता विविध संधी उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त मध्यपूर्वेकडील आखाती देशांमध्ये सुद्धा मत्स्य विज्ञान शाखेतील पदवीधारकांना फार मोठी मागणी आहे.
Nagpur News: मत्स्य विज्ञान क्षेत्रात करियर करायचंय? पाहा संपूर्ण प्रवेश प्रक्रिया
मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील प्रत्यक्ष मत्स्यपालन मासेमारी कापणे साठवणूक विपणन निर्यात औषध निर्माण, पुरवठा साखळी इत्यादी लघु मध्यम आणि मोठ्या उद्योगात मत्स्य पदवीधारकांना मोठ्या प्रमाणात नोकरी मिळत आहेत आणि भविष्यात या क्षेत्रात 2 ते 3 पटीमध्ये मनुष्यबळाची गरज आहे. मत्स्य विज्ञान पदवी प्राप्त पदवीधर विद्यार्थी आज अवगत तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारावर स्वतः मत्स्य व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजक होत आहेत आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला मोलाचा हातभार लावत आहेत, अशी माहिती नागपूर मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन बोंडे यांनी दिली आहे.