उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर, 9 जानेवारी : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली आहे, असं असलं तरीही भाजप आणि काँग्रेसचा उमेदवार ठरत नसल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, तर मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे. भाजप-काँग्रेसने अजूनही उमेदवार निश्चित केला नसल्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात भाजप प्रणित ना गो गाणार हे गेली दोन टर्म आमदार आहेत. शिक्षक मतदार संघाची ही निवडणूक भाजप थेट न लढता शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा देतात. मात्र गेल्या काही दिवसात भाजपने ही निवडणूक स्वतः लढवावी असा सूर नेत्यांचा होता. त्यामुळे भाजप मधून देखील अनेक नेते उमेदवारी साठी इच्छुक होते. कल्पना पांडे, अनिल शिवणकर यांनी यासाठी कामाला देखील सुरुवात केली होती, असं असताना देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागातील भाजप आमदारांची मते जाणून घेण्यासाठी उच्च स्तरीय बैठक घेतली. या बैठकीत बहुसंख्य आमदारांनी ना गो गाणार यांच्या उमेदवारीला पसंती दिल्याची माहिती पुढे आली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या निवडणुकीत शिक्षण परिषदेला पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले. विशेष म्हणजे भाजपने आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला असला तरी शिक्षण परिषदेने ना गो गाणार यांना तिसऱ्यांदा संधी देत उमेदवारी घोषित केली. त्यामुळे अर्ज सादर करण्याला कमी वेळ शिल्लक असल्याने भाजप समोर आता स्वतःहा उमेदवार उतरविणे किंवा गाणार यांना पाठिंबा देणे हे दोनच पर्याय शिल्लक आहेत. भाजप कडून ना गो गाणार यांना समर्थन देणार असल्याचं जवळ जवळ निश्चित असल तरी दुसऱ्या बाजूने मात्र उमेदवारी वरून काँग्रेस मध्ये अद्याप कुठलीही हालचाल नाही. गेल्या वेळी काँग्रेसने ही निवडणूक लढली त्याव्यतिरिक्त काँग्रेस देखील प्रत्यक्षपण ही जागा न लढवता समविचारी संघटनांना पाठिंबा देते, त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस गांभीर्याने घेत नसल्याचं चित्र आहे. उद्या नागपूरमध्ये काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. समविचारी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करायचा एवढेच सोपस्कार पार पाडण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचं देखील सांगितलं जातं. नागपूर शिक्षक मतदार संघात उमेदवार द्यायचा की नाही? कोणाला समर्थन द्यायचं? हे लवकरच ठरवणार. यासाठी भाजपची व्यूहरचना बघून त्याला भेदणारी रणनीती बनविणार असून उमेदवार विजयी कसा होईल? यावर भर असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसने शिक्षक भरतीची मदत घेत शिक्षक मतदारसंघात समर्थन देण्याचा शब्द दिला होता. उमेदवारी अर्ज भरायला दोन दिवस शिल्लक असताना देखील काँग्रेस याबाबत काहीच निर्णय घेत नसल्याने शिक्षक भारती मध्ये देखील नाराजी आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात या निवडणुकीत कुठल्या पक्षाचा कुठला उमेदवार असेल हे स्पष्ट होईल. विधान परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांकडे बहुमत नसल्याने त्यांच्या साठी ही जागा महत्त्वाची असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.