नागपूर, 9 डिसेंबर : अनेकांचे गावातून शहरात नोकरी करण्याचे स्वप्न असते. त्यामुळे अनेक जण शिक्षणानंतर शहराकडे धाव घेतात. मात्र, गावात राहूनही चांगल्याप्रकारे नियोजन करुन आर्थिक उन्नती साधता येते, हे एका तरुणाने साध्य करुन दाखवले आहे. या तरुणाने पुण्यातील नोकरी सोडली आणि रोपवाटिकेतून गावातच आपली प्रगती साधली.
सुचित ठाकरे असे या तरुणाचे नाव आहे. तो नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव येथील रहिवासी आहे. त्याने पुण्यातील नोकरी सोडत गावी येऊन आपली आर्थिक उन्नती साधली. कळमेश्वर तालुक्यात कापूस तूर, सोयाबीनसह भाजीपाल्याचेही उत्पादन घेतले जाते. मात्र, यासाठी शेतकऱ्यांना दूर अंतरावरून रोपे आणावी लागत होती. त्यामुळे यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत होते. या परिस्थितीचा विचार या तरुणाने केला. यानंतर त्याने भाजीपाला रोपवाटिका उभारली.
पुण्यातील नोकरी सोडली -
सुचित ठाकरे या तरुणाने संगीत विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. तो पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तसेच यासोबतच संगीत शिक्षक म्हणूनही पार्टटाइम काम करत होता. याप्रकारे तो आपला चरितार्थ चालवत होता. मात्र, त्याच्याकडे चार एकर शेती असल्याने त्याला नवीन काहीतरी करण्याची जिद्द होती. यातूनच मग त्याने स्थानिकांना रोपे आणण्यासाठी होणाऱ्या त्रासामुळे गावाकडे रोपवाटिकासंदर्भातील निर्णय घेतला.
शासकीय योजनेचा लाभ घेत गावातच रोजगार शोधू, या विचाराने त्याने पुणे सोडले. त्यात त्याला जिद्दीने कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या पिकाचा शोध घेताना रोपवाटिका हा नवीन पर्याय मिळाला. तालुक्यातील भाजीपाला उत्पादकांची गरज लक्षात घेता रोपे तयार करून विकण्याचे ठरविले. यासाठी त्याने तालुका कृषी कार्यालयाला संपर्क केला. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेतून शेडनेट उभारण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर एका वर्षात त्याने हे साध्य करुन दाखविले.
हेही वाचा - वय फक्त 25 अन् गड्यानं केली कमाल, सव्वा एकरातून कमावले तब्बल 23 लाख
परराज्यातूनही मागणी -
या रोपवाटिकेतील रोपांचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे त्याला कळमेश्वर, काटोल, सावनेर तालुका तसेच मध्य प्रदेशातील पांढुर्णा व सौंसर येथूनही मागणी आहे. सुचितच्या या रोपवाटिकेच्या माध्यमातून गावातील सात ते आठ महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Nagpur, Startup Success Story, Success story