विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 13 मे: छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले यांचे नाते अतुट आहे. या दोन गोष्टीतील अद्वैत समजले तर शिवचरित्राच्या मर्मात शिरता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोमहर्षक इतिहास ज्या दुर्गांच्या साक्षीने झाला ते किल्ले आजही एक स्फूर्तिस्थान म्हणून अनेकांना प्रेरणा देतात. शिवरायांच्या इतिहासातून अश्याच प्रकारे प्रेरणा घेऊन मूळचा केरळ मधील एक तरुण महाराष्ट्रातील किल्ले सायकल वर प्रवास करून सर करतो आहे. आता पर्यंत त्याने सायकल वरून 10,700 किमी चा प्रवास करून 194 किल्ले सर केले आहे. नुकतंच नागपूरमध्ये आल्यावर त्यानं या मोहीम विषयी माहिती दिली. शिवचरित्रातून मिळाली प्रेरणा हमरास एम. के. हा मूळचा केरळ इथला रहिवासी आहे. पेशाने तो ड्रायवर क्षेत्रात काम करत होता. दरम्यानच्या काळात त्याला यु-टूब, सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी माहिती मिळत गेली. महाराजांच्या इतिहासातील रोमहर्षक इतिहास आणि शिवचरित्रातील प्रसंगातून हमरास शिव विचारांनी भारावून निघाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाने प्रेरित होऊन शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे अजोड कार्य जाणून घेण्याचा निश्चय केला. याच उद्देशाने सायकलवरुन महाराष्ट्रतील गडकिल्ल्यांची परिक्रमा करण्याचा निर्धार केला. मागील वर्ष भरापासून तो या दुर्गांच्या वाटेवर असून त्याने आत्ता पर्यंत 194 किल्ले सर केले आहेत.
महाराष्ट्रातील 370 गड - किल्ल्यांना भेट देण्याचे व्रत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या दुर्गांच्या साक्षीने घडला ते किल्ले प्रत्यक्ष जाऊन अनुभवले पाहिजे हा विचार माझ्या डोक्यात आला. माझी आर्थिक परिस्थती बेताची असल्याने मला सायकल वरून किल्ले भ्रमण करणे परवडणारे होते. त्यासाठी मी, माझी सायकल आणि स्वतःशी केलेला निर्धार या शिवाय माझ्या कडे काहीही नव्हते. सायकल वरून प्रवास करण्या मागे काही करणे आहेत ते असे की, या प्रवासात माझी शारीरिक तंदुरुस्त तपासायची होती, काहीतरी वेगळे करून दाखवायचे होते. सोबतच समाजात गडकिल्ल्यांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे होते. दरम्यान मला महाराष्ट्रातील लोकांनी भरपूर प्रेम, आशीर्वाद देत सहकार्य केले आहे. मी या मोहिमेची सुरुवात सातारा पासून केली आणि शेवट किल्ले रायगड येथे करणार आहे. महाराष्ट्रातील 370 गड - किल्ल्यांना भेट देऊन येथील इतिहास मला जाणून घ्यायचा आहे, अशी माहिती हमरास एम. के. याने दिली. आजोबा रॉक्स, बाकी शॉक! वयाच्या 84 वर्षी उत्साह तरुणांनाही लाजवेल, आतापर्यंत पटकावले 114 मेडल्स, Video संकटातही सोडला नाही दुर्ग भ्रमंतीचा ध्यास मी मूळचा केरळचा असल्याने आणि पूर्वी हा भाग बघितला नसल्याने मला रस्ते, घाटवाटा, जंगल इत्यादीसह भाषेची देखील अडचण झाली. अनेकदा वाट भटकलो. काहीवेळा तर जंगली प्राण्यांनी देखील वाट अडवली. लोणावळा परिसरात माझा एक अपघात झाला होता. हा प्रसंग जीवावर बेतणारा होता मात्र माझे नशिब थोर आणि शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या प्रयत्नांमुळे मी यातून सुखरूप वाचू शकलो. या प्रवासात असंख्य अडचणी आल्या मात्र जिद्द, स्वतःशी केलेला निश्चय, महाराष्ट्रातील लोकांचे प्रेम आणि शिवरायांवरील निष्ठा या सगळ्यातून मार्ग काढत माझा प्रवास सुखरूप रित्या सुरू असल्याचे मत हमरास याने व्यक्त केले.