नागपूर, 19 डिसेंबर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही पार पडली, या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांसमोरच मन की बात बोलून दाखवली. तसंच पुढची अडीच वर्ष पदं मिळतील याची फार अपेक्षा ठेवू नका, असे संकेतच फडणवीस यांनी त्यांच्या या भाषणातून दिल्याचं पाहायला मिळालं. ‘अडीच वर्ष सरकारकडून काही मिळेल हे बघणं सोडा. त्यागाची तयारी ठेवा. मला काय मिळेल हे मनातून काढून टाका, आपल्याला लोक जास्त जागा देतील. मिळेल की नाही, मिळेल की नाही, असं असलं तर आपली कार्यक्षमता संपते. विरोधी बाकावर असताना आपले कार्यकर्ते ताकदीने उतरले. दोन वर्षात माझ्या सरकारला यशस्वी करणार आहे, ही भावना आली पाहिजे,’ असं देवेंद्र फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले. भाजपच्या याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर सक्रीय नसलेल्या भाजप आमदारांबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत त्यांचे कानही टोचले. सोशल मीडियावर सक्रीय नसलेल्यांची यादीच फडणवीस यांनी या कार्यक्रमात वाचून दाखवली.
Speaking at the @BJP4Maharashtra Meeting, Nagpur#WinterSession2022 #WinterSession https://t.co/hfmGdIH8Gn
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 19, 2022
‘9 जिल्हाध्यक्ष उत्तम आहेत, त्यांचं सोशल मीडिया चांगलं आहे. 5 जणांचं ठिकठाक आहे, पण 31 जणांनी चांगला वापर केला पण त्याची दखल नाही. 15 जण सक्रीयच नाहीत. काही आमदारांची फेसबुकवर 8-8 दिवस पोस्ट नाही. काहींचं तर ट्विटर अकाऊंटही ऍक्टिव्ह नाही. आपला सामान्य कार्यकर्ता नरेटिव्हची लढाई लढत आहे, पण पदाधिकारी नाही,’ अशा शब्दात फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे. तसंच आपण सगळ्यांनी चिंतन करायला हवं, असंही फडणवीस म्हणाले. भाजपचं मिशन दरम्यान आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचं मिशन सांगितलं. विदर्भामध्ये पुढच्या वेळी 11 खासदार आणि 50 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. तसंच निवडून येणारे हे लोकप्रतिनिधी शिंदे आणि फडणवीस यांचे असतील, असंही बावनकुळे म्हणाले.

)







