नागपूर, 13 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. नागपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुड्डू रज्जक नावाच्या एका पित्यानेच आपल्या दुसऱ्या पत्नीला फसवण्यासाठी स्वतःच्या मुलीच्या आत्महत्येचं बनाव करत मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वडील आणि मुलीचं नातं हे अगदी जीवाभावाचं आणि प्रेमाचं असतं. मात्र, एका नराधमाने बाप मुलीच्या या नात्याला काळिमा फासली आहे. ही धक्कादायक घटना कळमना पोलीस स्टेशन हद्दीत घडली. आरोपी पित्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत. त्यात सोळा वर्षाची मुलगी ही मोठी आहे. त्याने पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न केलं. मात्र, दुसरी पत्नीसोबत न राहता वडिलांच्या घरीच जास्त राहत असल्याने तिला आणि तिच्या परिवाराला धडा शिकविण्यासाठी त्याने मुलीचा सहारा घेतला. मुलीला आत्महत्या करण्याचा बनाव करायला सांगितलं. त्यासाठी त्याने छताला दोर बांधला आणि गळफास मुलीच्या गळ्यात टाकला आणि फोटो काढले. तसेच फोटो काढतानाच त्याने खाली ठेवलेले स्टूल हाताने आणि पायाने सरकवला आणि मुलीचा फास लागून जीव गेला. तसेच यानंतर त्याने मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव केला आणि यासंबंधी पोलिसात तक्रारसुद्धा दिली. मात्र, पोलिसांना यात संशय आला आणि त्यांनी तपास केला असता पित्यानेच मुलीची हत्या केल्याचं उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली. हेही वाचा - नवी मुंबई हादरली, दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा जागीच मृत्यू आरोपी हा विकृत स्वभावाचा असून त्याने आपल्या स्वार्थासाठी मुलीचा जीव घेतला. याआधी सुद्धा अशाच प्रकारे या मुलीने विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता तर त्याने मुलीच्या नावाने तिच्या पाच सुसाईड नोट लिहून ठेवल्या. त्यात त्यांनी त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाने माझ्यावर बलात्कार केला म्हणून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख मुलीला करायला लावल्याच सुद्धा पोलिसांच्या समोर आलं आहे. त्यामुळे अशा विकृत आरोपीला फाशी व्हावी, अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. तर आपल्या स्वार्थापायी या आरोपीने मुलीची हत्या केल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.