नागपूर, 21 एप्रिल : नागपूर जिल्ह्यातील 7 तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांनी आपल्या सावनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत भाजपला धक्का दिला आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर, रामटेक, कुही-मांढळ, उमरेड, भिवापूर, मौदा आणि पारशिवनी या सात ठिकाणी बाजार समित्यांच्या निवडणूक होणार आहेत. त्यापैकी सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा केदार गटाने बिनविरोध जिंकल्या आहेत. यापूर्वी सुद्धा सावनेर बाजार समितीवर केदार गटाचे वर्चस्व होते ते कायम ठेवण्यात त्यांना यावेळी सुद्धा यश आले आहे.. सुनील केदार यांच्या नेतृत्वात यापूर्वी नागपूर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश मिळाले होते. नागपूर जिल्हा परिषदेतसुद्धा केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आता बाजार समितीवर विजय मिळवून केदार यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नागपूर जिल्ह्यात होणाऱ्या बाजार समिती निवडणूक 1) सावनेर-बिनविरोध - केदार गट 2) रामटेक- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी 3) कुही- मांढळ- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी 4) पारशिवनी- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी 5) भिवापूर- 13 मे मतदान आणि 14 मे मतमोजणी 6) उमरेड- 13 मे मतदान आणि 14 मे मतमोजणी 7) मौदा- 30 एप्रिल मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी. वाचा - खेळ अजून संपला नाही, राज्यात लवकरच मोठा भूकंप, NCPच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट महाराष्ट्र शासनाच्या नव्या नियमानुसार या निवडणुका होत असून यामध्ये कोणताही शेतकरी (ज्याच्या नावाने सात बारा असेल) तो मतदान करू शकणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 13 कृषी उत्पन्न बाजार समित्या पैकी 6 बाजार समितीच्या निवडणुका वर्षभर पूर्वी झाल्या आहेत. आता 7 बाजार समितीच्या निवडणूक होत आहे. त्यापैकी सावनेर बाजार समितीवर केदार गटाने बिनविरोध बाजी मारली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो. निवडणुकांचे निकाल आल्यावर जिल्हा उपनिबंधक नोटीस काढतात आणि मग बाजार समिती सभापती, उपसभापती यांची निवड होत असते.

)







