नागपूर, 18 मार्च : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. या निवडणुकीत भाजप 240 जागा लढणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 48 जागा दिल्या जातील असं म्हटलं होतं. या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, चर्चेला उधाण आलं आहे. आता या सर्व प्रकरणावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे
मी जे बोललो त्यातला केवळ अर्धाच भाग दाखवण्यात आला आहे. खरं तर शिवसेना आणि भाजप मिळून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागा लढणार आहे. आम्ही एनडीएतील सर्व घटक पक्ष मिळून या जागा लढणार आहोत. विधानसभेची निवडणूक ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या समन्वयानं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाईल.
जागा वाटपाची चर्चा झालीच नाही
राज्यातील विधानसभेच्या 288 जागा जिंकण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. आतापर्यंत राज्यात युतीला जेवढं बहुमत मिळालं नाही, तेवढं बहुमत आम्ही मिळवणार आहोत. आम्ही तशी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. तेवढीच क्लिप व्हायरल करण्यात आली. अजून कुठलाही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. यासंदर्भात कुठलीही चर्चा सुरू झाली नसल्याचं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
ठरलं! भाजपचे जुने नेते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात दिसणार; 'या' नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी
जुने नेते पुन्हा मैदानात
आगामी काळात राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. सोबतच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका देखील जवळच येऊन ठेपल्या आहेत. भाजप आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पहायला मिळत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जुन्या नेत्यांना साद घातली जात आहे. मागील काही वर्ष पक्षामध्ये सक्रिय नसलेल्या नेत्यांना भाजप आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सक्रिय करणार आहे. नव्या दमाच्या पिढीसोबत भाजप अनुभवी नेत्यांनाही मैदानात उतरवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.