नागपूर, 24 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नागपुरातही सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता नागपुरमधून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ 20 रुपये उधारीवरुन झालेल्या वादातून चिकन विक्रेत्याने पाणीपुरी दुकानदाराला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना नागपुरमधील जरीपटका परिसरात घडली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुकानदारावर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून होता. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मात्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत पाणीपुरीचा ठेला लावून पीडित विक्रेता आपला उदरनिर्वाह करतो. मात्र, त्याच्याच बाजूला चिकनचे दुकान असलेल्या आरोपीने या ठेलेवाल्याकडून 20 रुपयाची उधारीवर पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरीवाल्याने जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे उधारीचे पैसे मागितले. तेव्हा आरोपीला राग आला अणि त्याने धमकी दिली. यानंतर आरोपीने आपल्या चिकनच्या दुकानात जाऊन कोंबडी कापण्याचा चाकू घेऊन आला आणि त्याच्या पोटात भोसकला. यामध्ये पाणीपुरीवाला गंभीररित्या जखमी झाला.
यानंतर आरोपीने त्या ठिकाणावरून पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी त्याला शोधून अटक केली. केवळ 20 रुपयाच्या उधारीवरून या आरोपीने चक्क त्या पाणीपुरीवाल्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला. या घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nagpur News