नागपूर, 31 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ई-रिक्षा चालविणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला प्रेमसंबंधातून पळवून नेल्यानंतर त्याच महिलेच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
मोनू ऊर्फ संतोष गौतम निकोसे (35, सावित्रीबाई फुलेनगर) आणि बॉबी गौतम निकोसे (32, रामबाग इमामवाडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सचिन नरेश धनविजय (41, रामबाग) असे फिर्यादी ई-रिक्षाचालकाचे नाव आहे.
ई-रिक्षाचालक सचिनच्या पहिल्या पत्नीचे आरोपी मोनूसोबत दोन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यामुळे ती मुलीसह घरातील किमती वस्तू घेऊन मोनूसोबत पळून गेली होती. तेव्हापासून मोनू आणि सचिनमध्ये नेहमी खटके उडत होते. याच वादातून आरोपींनी सचिनवर जीवघेणा हल्ला केला.
हेही वाचा - आई म्हणाली, त्याच्यासोबत संबंध ठेवू नकोस..., मुलीने प्रियकरासोबत मिळून केला तिचाच गेम
सचिन गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ई-रिक्षात प्रवासी घेऊन जात होता. याचवेळी आरोपी मोनू आणि बॉबीने दुचाकीवर येत सचिनला लाकडी दांड्याने डोक्यावर, पाठीवर, कंबरेवर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.
याप्रकरणी फिर्यादी सचिनच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम 307, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.