वडिलांनी दिलं केकचं आश्वासन, पण पैसे न दिल्याच्या रागातून पदवीच्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल
वडिलांनी दिलं केकचं आश्वासन, पण पैसे न दिल्याच्या रागातून पदवीच्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल
मारिया ही वडील, आई व लहान भावासोबत घरी गुरुवारी 21 जुलैला जेवायला बसली होती. यावेळी तिने माझा शुक्रवारी वाढदिवस आहे, मला पैसे हवे आहेत, असे आपल्या पालकांना सांगितले.
भंडारा, 23 जुलै : भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.एका मुलीला वाढदिवस साजरा करण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाहीत, म्हणून या मुलीने अत्यंत टोकाचे पाऊल उचलत धक्कादायक निर्णय घेतला. तिने स्वयंपाक खोलीतील लोखंडी हुकाला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण घटना -
वाढदिवस साजरा करण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाहीत, म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील इंदिरानगरात शुक्रवारी उघडकीस आली. मृत विद्यार्थिनी लाखनीच्या समर्थ महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाला शिकत होती. मारिया ऊर्फ खुशी अहमद सैय्यद (19, रा. इंदिरानगर, सिपेवाडा रोड, लाखनी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
आई मदरशात शिकवायला गेली अन् इकडे -
मारिया ही वडील, आई व लहान भावासोबत घरी गुरुवारी 21 जुलैला जेवायला बसली होती. यावेळी तिने माझा शुक्रवारी वाढदिवस आहे, मला पैसे हवे आहेत, असे आपल्या पालकांना सांगितले. त्यावर वडिलांनी सकाळी कामावर जातो व सायंकाळी केक आणतो, असे सांगितले. त्यानंतर रात्री सर्वजण झोपून गेले. यानंतर शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मारियाचे वडील कामाला निघून गेले.
तर लहान भाऊ कवनेल सैय्यद (17) हा नळ फिटिंगच्या कामासाठी नागपूरला चालला गेला. यानंतर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आई तबसुम अहमद सैय्यदही गोंडमोहल्ला येथील मदरशात शिकवायला निघून गेली. याचदरम्यान मारिया घरी एकटीच होती. तसेच रात्रीचा वडिलांनी वाढदिवसाला पैसे दिले नाही म्हणून अजूनही तिच्या डोक्यात राग होता. याच रागातून मारियाने खोलीतील लोखंडी हुकाला ओढणी बांधून गळफास लावत आत्महत्या केली.
हेही वाचा - नागपूर जिल्ह्यात 42 वर्षीय महिलेची आत्महत्या, सातव्या माळ्यावरुन घेतली उडी
दरम्यान, दुपारच्या सुमारास स्थानिकांच्या लक्षात ही घटना येताच मारियाला लगेचच ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यावेळी डॉ. मिलिंद भुते यांनी मारियाला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक गौरीशंकर कडव करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.