मुंबई, 19 एप्रिल : मुंबई (Mumbai) जवळील वांगणी रेल्वे स्थानकावर (wangani Railway station) एका अंधमातेच्या मुलाला पॉइंटमनने प्रसंगवधान दाखवत वाचवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मला एकूलता एकच मुलगा असून तोच मला आधार आहे, असं म्हणत अंध मातेनं पॉइंटमन मयूर शेळकेचे आभार मानले आहे. तसंच, त्याला एखादे बक्षीस किंवा पुरस्कार द्यावा, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.
अंध मातेनं घडलेल्या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत मयूर शेळकेचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
'त्या दिवशी आम्ही रेल्वे पकडण्यासाठी चाललो होतो. आमचं हातावर पोट आहे, म्हणून काम करावं लागत असतं. म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन चालली होते. त्याचवेळी माझा मुलगा रेल्वेच्या रुळावर पडला होता. समोरून मोठी एक्स्प्रेस गाडी आली होती. तिथे कुणीही मदत करण्यासाठी नव्हतं. पॉइंटमन मयूर शेळके हा तरुण होता. त्याने जीव धोक्यात घालून माझ्या मुलाचे प्राण वाचवले. त्याच्या या धाडसाबद्दल त्याला बक्षीस द्यावे, कोणता तरी पुरस्कार द्यावा, ही माझी नम्र विनंती आहे, अशी इच्छा या अंधमातेनं बोलून दाखवली.
'मला एकच मुलगा आहे, तो आज इथे आहे, तोच मला आधार आहे. मयूरने आपला जीव धोक्यात घालून माझ्या मुलाला वाचवलं, असं म्हणत या महिलेनं मयूरचे आभार मानले.
काय घडलं होतं नेमकं?
वांगणी स्टेशनवर शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 3 मिनिटांनी एक मुलगा आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालत असताना त्या लहानग्याचा तोल गेला आणि तो मुलगा ट्रॅकवर पडला. लहान मुलगा जेव्हा रेल्वेच्या ट्रकवर पडला नेमकं त्याच वेळेला एक मेल-एक्सप्रेस त्या मुलाच्या दिशेने येत होती. त्या मुलाची आई अंध होती, ती आपला मुलगा नेमका कुठे पडला हे चाचपडत होती. बिचारी कावरी बावरी झाली होती. तिला कळेना की नेमका तो कुठे पडला आणि तितक्यात उदयन एक्सप्रेस धडधड आवाज करत स्टेशनच्या दिशेने जोरदार वेगाने येत हाती.
#WATCH | Maharashtra: A pointsman in Mumbai Division, Mayur Shelkhe saves life of a child who lost his balance while walking at platform 2 of Vangani railway station & fell on railway tracks, while a train was moving in his direction. (17.04.2021)
(Video source: Central Railway) pic.twitter.com/6bVhTqZzJ4 — ANI (@ANI) April 19, 2021
तो लहानगा अजून सावरला पण नव्हता आणि ट्रेनही जवळ येताना दिसली. तो मुलगा प्लॅटफॉर्मवर चढायचा प्रयत्न करत होता, पण प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने तो वर चढू शकत नव्हता. तितक्यात एक व्यक्ती जिवाच्या आकांताने त्या मुलाच्या दिशेने धावताना दिसली.
तो व्यक्ती आपल्या जिवाची पर्वा न करता त्या मुलापर्यंत पोहोचला. पटकन त्याने मुलाला उचललं आणि प्लॅटफॉर्मवर फेकून दिलं आणि तो स्वतः विजेच्या गतीने प्लॅटफॉर्मवर चढला. तो व्यक्ती म्हणजे रेल्वेचा पॉइंटमन मयूर शेळके. मयूर कर्तव्यावर होता. त्याही परिस्थितीत त्याने आपल्या हातातील हिरवा झेंडा सोडला नाही.
मयूर हा पॉईंटमन आहे. पॉईंटमन म्हणजे ट्रेनला पुढे जाण्यासाठी ट्रॅक सुरक्षित आहे म्हणून हिरवा झेंडा दाखवण्याचं काम असो की जिथे ट्रॅक एकमेकांत गुंतलेले असतात तिथे सगळं आलबेल आहे हे पाहण्याचं काम करतात.
मयूर नसता तर त्या मातेने आपल्या मुलाला कायमचं गमावलं असतं. मोठा अपघात आणि दुर्दैवी घटना होण्यापासून मयूर शेळकेने वाचवलं. मयूर शेळकेच्या धैर्याला सलाम, अशी प्रतिक्रिया आता उमटताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.