मुंबई, 01 डिसेंबर : गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणुक असल्याने सगळ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे गुजरातसह अन्य राज्यातही त्याचे पडसाद दिसणार आहेत. दरम्यान यावर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. त्यांनी या निवडणुकीतल भाजप विजयी होईल असे वक्तव्य केलं आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होईल परंतु त्यांना अत्यंत कमी बहुमत मिळेल असे ते म्हणाले. याचबरोबर त्यांनी राज्यातील नेत्यांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं मला अजिबात वाटत नाही, मंत्रिमंडळ विस्तार हा केवळ वावड्या पिकवल्या जात असल्याचे दिसून येत आहे. पळून जाणाऱ्या गद्दारांना थांबविण्यासाठी ही अफवा असल्याचेही ते म्हणाले. विस्तार करू म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आमिषे दाखविली जातात पण प्रत्यक्षात विस्तार काही होणार नाही असे राऊत म्हणाले.
हे ही वाचा : राष्ट्रवादीने जातीच्या राजकारणासाठी वापरलं शिवरायांचं नाव, राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
उद्धवजी ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्रीबाबत चांगली सूचना केलेली आहे, महाराष्ट्रामध्ये सक्षम महिला मुख्यमंत्री मिळालेल्या नाहीत, ते मिळण्याची आवश्यकता आहे, शिवसेना-महाविकास आघाडीकडून तसा प्रयत्न होत असेल तर महाराष्ट्रातल्या महिलांचा तो सर्वोच्च बहुमान असेल असे राऊत म्हणाले.
राज ठाकरेंचे कोकणात स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत, त्यांचं स्वागत आहे, कोकणातील वातावरण सुद्धा खूप चांगलं आहे, या वातावरणाचा आणि कोकणातील जेवणाचा त्यांनी आस्वाद घ्यावा. त्यांनी आपली तब्येत चांगली कशी होईल यादृष्टीने त्यांनी पाहावं, मात्र त्यांच्या पक्षाला हे वातावरण पोषक नाही. या पुढेही असणार नाही. अशी खोचक टीका राऊत यांनी केली.
मंगलप्रभात लोढांवर सडकून टीका
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याबद्दल बोलताना खा. राऊत म्हणाले, दुर्दैवाने या सगळ्या नतद्रष्ट लोकांना कोणाचीही बरोबरी करताना तुलना करताना केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि त्यांच्याशी या मिंदे गटाच्या लोकांची तुलना करावी हे दुर्दैव आहे.
हे ही वाचा : माझ्यामुळे जर भाजपची अडचण होत असेल तर.., उदयनराजे संतापून स्पष्टच बोलले
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आणि मोगलांच्या विरुद्ध लढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या होत्या आणि एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी खालेल्या ताटामध्ये घाण केली आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.