मुंबई, 5 एप्रिल : कविवर्य मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे...सांग कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत...प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही दु:ख, अडथळे असतात. मात्र याचा अर्थ अख्खं आयुष्य त्याच दु:खाचा विचार करीत घालवायचं का? तर आयुष्यातील प्रत्येक क्षणात आनंद शोधत मनमुराद जगायचं...या ओळी वाचायला किंवा ऐकायला छान वाटतात. मात्र जेव्हा प्रत्यक्षात असं वागण्याची वेळ येते, तेव्हा खरं आव्हान असतं. मात्र आपल्या वाट्याला आलेल्या गोष्टीतूनही चांगला जगता येऊ शकतं. असाच एक अनुभव योजना यादव यांनी आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. काही जणांचा कदाचित हा खूप लहान प्रसंग वाटेल. मात्र याच लहानसहान गोष्टींमध्ये जीवनाचं मूल्य दडलेलं असतं.
हा किस्सा आहे एसटीमध्ये काम करणाऱ्या एका महिलेचा. ही महिला तिकीट काढण्यात काम करते. पहाटे 5 ची एसटी. मात्र या प्रवासादरम्यान महिला कर्मचारीची एक गोष्ट मनाला खूप भावली. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिलं आहे की....-
तिनं आधी तिकिटं काढली. सगळ्यांचे तिकिटाचे व्यवहार चोख केले. गाडी सुरू झाली. नि ती ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर स्थिरावली. पर्समधून फुलं बाहेर काढली. दोन तीन फुलं केसात माळली. दोन तीन फुलं ड्रायव्हर शेजारी ठेवली. पुन्हा पर्समधून सुई दोरा काढला. आणि ती तल्लीन होऊन फुलं गुंफू लागली. माळ तयार झाली. ती तिनं ओंजळीत धरली. ओंजळ नाकाशेजारी नेत दीर्घ श्वास घेतला. तेव्हा तिचा चेहरा त्या सुगंधाशी स्पर्धा करत होता. पुढच्या थांब्यावर गाडी थांबली, तशी ती उठली आणि तिने ती माळ ड्रायव्हरच्या केबिनमध्ये लटकावली. तेवढ्यात शेजारी शिवशाही येऊन थांबली. शिवशाहीच्या ड्रायव्हरलाही तिच्या माळेचा मोह झाला. तो म्हणाला,'आम्हालाही द्या की मॅडम' पण तिची फुलं संपली होती.
पहाटे साडे पाचची ही गाडी. नुसतं आवरून गाडी गाठायची तरी चार साडेचारला उठण्याला पर्याय नाही. तेवढ्यात आपल्यासोबतच्या लोकांचा प्रवास सुखकर करण्याचा विचार करून ही पहाटे उठून फुलं तोडून माळेची तयारी करून कामावर हजर झालेली. कामं सगळेच जण करतात. पण त्यातल्या अनिवार्यतेला वैतागलेले असतात. पण थोडयाशा प्रयत्नाने ती अनिवार्यता एखादया सुखद अनुभवात रुपांतरीत करता येते.
काही माणसं 'हो सके तो इसमे जिंदगी बिता दो, पल जो ये जानेवाला हैं' च्या तत्वानं जगत असतात. अशी माणसं मला सहधर्मा वाटतात.
अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया केल्या आहे.
जगण्याच्या या पैलूकडे इतक्या सकारात्मक पद्धतीने पाहिलं तर खरंच सर्वे संतू सुखीन: होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.