मुंबई, 05 फेब्रुवारी: ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न 92 वर्षीय लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा, यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital Mumbai) जाऊन लतादीदींच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. लता मंगेशकर यांच्यावर गेल्या 27 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. पण, आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्यांनी लतादीदींच्या प्रकृतीची विचारणा केली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. यावेळी राज ठाकरे यांनी मीडियाशी बोलणं टाळलं. स्तब्ध होऊन राज ठाकरे हॉस्पिटलबाहेर उभे होते. लतादीदी यांची तब्येत ठीक आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत. दीदी व्हेंटिलेटरवर आहेत.. उपचार सुरू आहेत. चुकीच्या बातम्या चालवू नका, मी डॉक्टरांना सांगितलं खाली जाऊन मेडिकल अपडेट द्या. जेणेकरून लोकांच्या मनातील प्रश्नांना योग्य उत्तर मिळतील, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. आता त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती नाजूक आहे, पण त्या उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्यांच्या तब्येतीवर डॉक्टर नजर ठेवून आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे डॉक्टर प्रतुत सदनानी यांनी दिली. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतुत समधानी आणि त्यांची टीम त्यांच्या प्रकृतीची सतत काळजी घेत आहे. पुन्हा एकदा लतादीदींची तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांनी त्यांना तातडीनं व्हेंटिलेटरवर ठेवलं. त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांचे पथक 24 तास रुग्णालयात हजर असतं. 6-7 दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढलं होतं लता मंगेशकर यांना 6-7 दिवसांपूर्वी डॉक्टरांनी व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढून टाकलं होतं. तेव्हा डॉक्टर प्रतित समधानी यांनी सांगितले होतं की, त्यांची प्रकृती सुधारत आहे, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढून टाकण्यात आलं आहे. मात्र ते आयसीयूमध्ये वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. वयाच्या 13 व्या वर्षी लतादीदींची करिअरला सुरुवात भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान पार्श्वगायिका म्हणून, लता मंगेशकर यांनी 1942 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी विविध भारतीय भाषांमध्ये 30,000 हून अधिक गाणी गायली आहेत. आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘अजीब दास्तान है ये’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘नीला अस्मान सो गया’ आणि ‘तेरे लिए’ सारख्या अनेक संस्मरणीय गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.