मुंबई, 13 मार्च : भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्याविरोधात नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे (Former MP Nilesh Rane) या दोघांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत जोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष महाराष्ट्र यांनी आपल्या तक्रारीत म्हटले, निलेश राणे आणि नितेश राणे यांनी जाणीवपूर्वक समाजामध्ये द्वेषाच्या भावना वाढवण्याच्या उद्देशाने भाष्य करुन दंगल घडविण्याचा कट रचत असल्याबाबत आणि शरद पवार साहेबांचे नाव दाऊद इब्राहिमसोबत जोडून त्यांच्या जिवाला धोका निर्माण केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात यावी.
आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटलं, शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाग असणाऱ्या महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात सरकार आहे. 28 फेब्रुवारी 2022 रोजी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने दाऊद इब्राहिम संबंधित गुन्ह्याच्या तपासात अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास चालू असून नवाब मलिकांविरोधात काहीही सबळ पुरावा मिळाला नाहीये.
वाचा : मुंबई पोलिसांची देवेंद्र फडणवीसांना नोटीस, नेमकं काय घडलं?
नवाब मलिकांच्या अटकेचा प्रश्न हा न्यायप्रविष्ट असून भाजपचे काही नेते जाणीवपूर्वक नवाब मलिकांचे नाव कुख्यात गुंड आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमसोबत जोडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. नवाब मलिकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाष्य केलं. शरद पवारांनीही भाष्य करत म्हटलं, नवाब मलिक हे मुस्लिम असल्या कारणाने त्यांना निशाणा केल्याचे सांगितले.
6 मार्च 2022 रोजी आमदार निलेश राणे यांनी आझाद मैदानावरील मोर्चाला संबोधित करताना नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही अशी विचारणा शरद पवारांना केली. वास्तविकरित्या राजीनामा घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे. अनिल देशमुखांचा मराठा म्हणून राजीनामा घेतला पण नवाब मलिक मुस्लिम असल्या कारणाने त्यांचा राजीनामा घेत नाही असे संबोधून नितेश राणे हे हिंदु-मुस्लिम गटात तेढ व द्वेष निर्माण करुन लोकांना प्रक्षोभित करुन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.
वाचा : पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केला आणखी एक गौप्यस्फोट
9 मार्च 2022 रोजी माजी खासदार निलेश राणे यांनी 'शरद पवार साहेब, दाऊदचा माणूस आहे आणि पाकिस्तानचा एजंट आहे' असं ट्विट केले आहे. 13 मार्च 2022 रोजी निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत शरद पवार हे दाऊदचा माणूस असून नवाब मलिकांचा राजीनामा घेत नसल्याचे विधान करुन पुन्हा समाजात शांतता भंग व तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असंही तक्रारीत म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Mumbai police, Nilesh rane, Nitesh rane, शरद पवार